पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे रस्ते खोदाईसाठी ‘नागपूर पॅटर्न’, खड्डे बुजविण्याची जबाबदारी महावितरणवर राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 05:08 AM2018-02-12T05:08:57+5:302018-02-12T05:12:35+5:30
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत महावितरणकडून नव्याने ७० किलोमीटर उच्चदाब वाहिनी, तर २९ किलोमीटर लघुदाब वाहिनी भूमिगत करण्याचे प्रस्तावित आहे. रस्ता पुनर्स्थापनेबाबत नागपूर महापालिका आणि महावितरण यांच्यात सामंजस्य करार झाला असून, रस्त्याचे चर बुजविण्याचे काम महावितरणकडे सोपविण्यात आले आहे.
या ‘नागपूर पॅटर्न’नुसार महावितरणकडून एकत्रित रस्ता दुरुस्ती खर्च आणि अधिभार शुल्क घेण्याऐवजी पिंपरी महापालिकेने चर बुजविण्याचे काम महावितरणकडेच सोपवावे. तसेच, चर दुरुस्ती अथवा दोष उत्तरदायित्व कालावधीत रस्ता सुस्थितीत ठेवण्यास महावितरण असमर्थ ठरली तर महापालिकेने रस्ता दुरुस्ती करावी. त्याचा खर्च महावितरणच्या वीजबिलातून वजा करावा, असा धोरणात्मक निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत विविध रस्त्यांमधून भूमिगत सेवावाहिन्या टाकल्या जातात. सरकारी, निमसरकारी आणि खासगी संस्था रस्ता खोदाईसाठी महापालिकेकडे अर्ज करतात. नागरिकांच्या सोईसाठी सेवावाहिन्या आवश्यक असल्याने महापालिका भूमिगत खोदकामाला परवानगी देते. त्यासाठी रस्ता दुरुस्ती खर्च महापालिकेने निश्चित केला आहे. तो संबंधितांकडून आगाऊ वसूल करण्यात येतो. सध्या प्रतिमीटर रस्ता दुरुस्ती खर्च सरासरी ६ हजार ५०० रुपये आणि महापालिका अधिभार सरासरी ३ हजार रुपये आहे. खासगी, सरकारी-निमसरकारी संस्थांना सेवावाहिन्या टाकण्यासाठी हे शुल्क आकारुन रस्ता खोदकामासाठी परवानगी दिली जाते. खोदकामानंतर महापालिका निविदा काढून चर बुजविण्याचे काम देते.
पायाभूत आराखड्यांतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला रस्ते खोदकामाचा सवलतीचा दर बहाल केला आहे. त्यानुसार एकत्रित रस्ता दुरुस्ती खर्च आणि अधिभार शुल्कापोटी महावितरणकडून दीड हजार रुपये आकारण्यात येते असे. सेवावाहिन्यांसाठी खोदलेल्या चरांची दुरुस्ती महापालिकेतर्फे केली जाते. सध्या पायाभूत आराखडा - २ अंतर्गत भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी २ हजार ३०० रुपये प्रतिमीटर शुल्क आकारले जाते.
सन २०१५-१६ मध्ये महावितरणने ७९.४२ किलोमीटर रस्त्याची खोदाई केली. त्यापोटी १८ कोटी २६ लाख रुपये शुल्क पिंपरी महापालिकेने आकारले. तर, सन २०१६ - १७ मध्ये दीड किलोमीटर खोदाईसाठी २६ लाख रुपये घेतले. सन २०१७ - १८ मध्ये केवळ २ लाख ३० हजार रुपये शुल्क महापालिका कोषागारात जमा झाले.
सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर
१ पुणे महापालिका महावितरणकडून प्रतिमीटर २ हजार ३५० रुपये शुल्क आकारते. हेच शुल्क पिंपरी महापालिकेने आकारावे, अशी विनंती महावितरणच्या पुणे परिमंडल मुख्य अभियंत्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे. महावितरणला पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत नव्याने ७०.१६ किलोमीटर उच्चदाब वाहिनी, तर २८.३५ किलोमीटर लघुदाब वाहिनी भूमिगत करायची आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने १८ मार्च २०१६ रोजी नागपूर महापालिका आणि महावितरण यांच्यातील ‘रोड रिइंस्टेटमंट’बाबतचा सामंजस्य करार राज्यातील सर्व महापालिकांना पाठवीत त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्याचा आधार घेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचा सर्वसाधारण सभेपुढे सादर केला.
कार्यकारी अभियंताच समन्वयक
२या सामंजस्य करारानुसार, क्षेत्रीय कार्यालयांच्या स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची महापालिका समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाईल. महावितरणचे समन्वय अधिकारी आणि महापालिकेचे समन्वय अधिकारी एकत्रितपणे रस्तेकामाची पाहणी करतील. आयुक्तांच्या मान्यतेनंतर महावितरणकडून प्रतिमीटर १०० रुपये देखरेख शुल्क आकारले जाईल. त्या वेळी रस्ते खोदाईची परवानगी दिली जाईल. खोदकामानंतर चर बुजविण्याची जबाबदारी महावितरणची असेल. स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडून महावितरणने ‘ना हरकत’ दाखला घेणे बंधनकारक आहे. या कामासाठी दोष उत्तरदायित्व कालावधी दोन वर्षांचा असेल. चर सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी महावितरणची असणार आहे.