स्मार्ट सिटी म्हणून नावलौकिक असणाऱ्या पिंपरी महापालिकेचे संकेतस्थळच नाही 'अपडेट'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 11:28 PM2021-01-05T23:28:45+5:302021-01-05T23:31:39+5:30
बदली झालेल्या तसेच नव्याने नियुक्त अधिकाऱ्यांची मिळेना माहिती
पिंपरी : बेस्ट सिटी, स्मार्ट सिटी म्हणून शहराचा नावलाैकिक आहे. तसेच केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन्मान करण्यात आला आहे. महापालिकेचे संकेतस्थळ दिव्यांग व्यक्तींना वापरण्याच्या दृष्टीने सोयीचे केल्याने हा पुरस्कार प्रदान केला. मात्र महापालिकेच्या संकेतस्थळावर अद्ययावत माहिती नाही. त्यामुळे संबंधित विभागाचे कामकाज ढेपाळल्याचे दिसून येते.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी डिसेंबरमध्ये क्षेत्रीय स्तरावरील तसेच इतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी नवीन जबाबदारी स्वीकारून कामकाज नियमितपणे सुरू केले आहे. मात्र कोणत्या विभागात कोणाची बदली झाली आहे, त्यांचा संपर्क क्रमांक, त्यांची जबाबदारी याबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळणे दुरापास्त झाले आहे. संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
संकेतस्थळ अद्ययावत करण्याची तसेच त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेच्या आयटी विभागाकडे आहे. संबंधित विभागाकडून वेळोवेळी संकेतस्थळामध्ये बदल केले जातात. तसेच त्यात सुधारणा करून युजर्स फ्रेंडली केले जाते. महापालिकेच्या विविध विभागांकडून माहिती संकलित करून संकेतस्थळावर ती माहिती अद्ययावत करण्याची जबाबदारीही आयटी विभागाचीच आहे. मात्र संबंधित विभागांकडून माहिती उपलब्ध होण्यात अडचणी येत असून समन्वयाचा अभाव दिसून येतो.
पोलीस आयुक्तालय झाले माहिती मात्र चाैक्यांचीच
पिंपरी-चिंचवड शहरासाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. तत्पूर्वी एका परिमंडळांतर्गत उपायुक्त दर्जाचा पोलीस अधिकाऱ्याकडे शहराची जबाबदारी होती. त्यावेळच्या पोलीस चाैक्यांचे संपर्क क्रमांक महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर संबंधित माहिती अद्ययावत करून पोलीस आयुक्तालय, पोलीस ठाणे यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ते शक्य नसल्यास चुकीचे संपर्क क्रमांक संकेतस्थळावरून हटविणे अपेक्षित आहे. मात्र आयटी विभाग याबाबत उदासीन आहे.
बदली झालेल्या तसेच नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांची माहिती संबंधित विभागांकडे मागितली आहे. त्याबाबत त्यांना इ-मेलव्दारे दोन ते तीन वेळा संपर्क साधला आहे. तरीही त्यांच्याकडून माहिती उपलब्ध झालेली नाही. माहिती उपलब्ध झाल्यानंतर संकेतस्थळ अद्ययावत करण्यात येईल.
- निळकंठ पोमण, प्रमुख, माहिती व तंत्रज्ञान विभाग, महापालिका