उन्हाचा चटका वाढल्याने लिंबांना आला ‘भाव’, एक लिंबू ८ ते १० रुपयांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:31 IST2025-04-23T16:31:05+5:302025-04-23T16:31:54+5:30

बाजारात रसाळ, मोठ्या आकाराच्या लिंबांचे दर जास्त असूनही त्यांना अधिक मागणी आहे.

Pimpri Chinchwad news Lemons have gained in price as the heat of the summer increases, one lemon costs Rs 8 to 10 | उन्हाचा चटका वाढल्याने लिंबांना आला ‘भाव’, एक लिंबू ८ ते १० रुपयांना

उन्हाचा चटका वाढल्याने लिंबांना आला ‘भाव’, एक लिंबू ८ ते १० रुपयांना

पिंपरी : उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बाजारात लिंबांचे दर कडाडले आहेत. बाजारात लिंबांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात एक लिंबू दर्जानुसार ८ ते १० रुपयांना एक नग मिळत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने दर तेजीत आहेत.

बाजारात रसाळ, मोठ्या आकाराच्या लिंबांचे दर जास्त असूनही त्यांना अधिक मागणी आहे. या महिनाभरापासून लिंबांना अधिक मागणी वाढली आहे. त्यामुळे भावात प्रचंड वाढ झाली आहे. जूनपर्यंत हीच स्थिती कायम राहील, असे पिंपरी बाजारपेठेतील व्यापारी आबासाहेब रायकर यांनी सांगितले.

पिंपरी बाजारात गेल्या दीड-दोन महिन्यांपूर्वी ३०० ते ४०० गोणी लिंबांची आवक होत होती. मात्र, सध्या ही आवक निम्म्यावर आली आहे. बाजारात सध्या १५० ते २०० गोण्यांची आवक होत आहे. त्यातच आता उन्हाच्या वाढत्या झळांमुळे लिंबांना मागणी वाढली आहे. एका गोणीत आकारमानानुसार ३५० ते ४५० लिंबू असतात. सध्या घरगुती वापराबरोबरच हॉटेल्स, रसवंतिगृह आणि ज्यूस सेंटरकडून लिंबांना मोठी मागणी असते.

येथून लिंबांची होते आवक

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून लिंबू बाजारात येत असून, अहमदनगर जिल्ह्यातील राशीन, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथूनही लिंबू येत आहेत. 

उन्हाळ्यामुळे लिंबांच्या लागवडीवर परिणाम झाला असून, गेल्या महिनाभरापासून लिंबांची आवक कमी होत आहे. लिंबांना बाराही महिने मागणी असते. मात्र, उन्हाळ्यात ती खूप मोठ्या प्रमाणात असते. जून महिन्यापर्यंत लिंबांचे दर तेजीतच राहणार आहेत. पाण्याअभावी लिंबाचे उत्पन्न कमी निघत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम लिंबांच्या उत्पन्नावर होत आहे. - आबासाहेब रायकर, व्यापारी, पिंपरी बाजारपेठ 

Web Title: Pimpri Chinchwad news Lemons have gained in price as the heat of the summer increases, one lemon costs Rs 8 to 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.