गुन्हेगारीला ‘अंकुश’ लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 05:22 PM2022-05-19T17:22:18+5:302022-05-19T17:31:44+5:30
या कारवाईत ८१ आरोपी मिळून आले
पिंपरी : गुन्हेगारीला ‘अंकुश’ लावण्यासाठी पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून गुरुवारी (दि. १९) कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. यात तीन आरोपी आरोपी शस्त्र बाळगताना मिळून आले. त्यांच्याकडून हत्यार जप्त केले. तसेच या कारवाईत ८१ आरोपी मिळून आले.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून शहरातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यात आला. यात प्रत्येक पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगार, फरार आणि पाहिजे आरोपी यांची माहिती घेण्यात आली. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त शिंदे यांनी दिल्या. त्यानुसार पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. गुन्हे शाखेचे युनिट एक ते पाच, खंडणी विरोधी पथक, दरोडा विरोधी पथक, शस्त्र विरोधी पथक यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून पहाटे पाचपर्यंत हे कोम्बिंग ऑपरेशन केले. यात गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तीन आरोपींना अटक केली. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१चे कलम ३७(३) सह १३५ प्रमाणे दोन गुन्हे दाखल केले. तसेच एक लोखंडी कोयता, मोबाईल व गुन्ह्यत वापरलेली दुचाकी असा ५६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
रेकाॅर्डवरील १३० आरोपी चेक केले. त्यातील ६० आरोपी मिळून आले. हिस्ट्रीशिटर ५२ आरोपी चेक केले. त्यातील १५ मिळून आले. गुंड, मवाली १८ चेक केले. त्यातील सहा मिळून आले. तसेच तडीपार आरोपी ९५, फरार आरोपी १२, पाहिजे आरोपी ८४, जबरी चोरी करणारे पाच आरोपी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान चेक केले. यात मिळून न आलेल्या गुन्हेगारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
पोलीस ठाण्यांकडूनही कारवाई
गुन्हे शाखेप्रमाणेच पोलीस ठाण्यांकडूनही कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात रात्री उशिरापर्यंत विनाकारण फिरणाऱ्या पाच जणांवर, रात्री उशिरापर्यंत हाॅटेल सुरू ठेवल्याप्रकरणी १० जणांवर तसेच गोंधळ घालत असलेल्या १५ आणि इतर सहा जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमानुसार पाच जणांवर कारवाई केली. तसेच दोन जणांना अटक करण्यात आली आणि पाच जणांना ‘वाॅरंट’ बजावण्यात आले. तसेच भादंवि कलम ३७९ अन्वये एका आरोपीला अटक केली.