पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय विभागले तीन भागात; तिसऱ्या परिमंडळास मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 01:28 PM2023-09-06T13:28:57+5:302023-09-06T13:30:18+5:30
परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त म्हणून संदीप डोईफोडे यांची नियुक्ती केली....
पिंपरी : शहर पोलिस दलासाठी आणखी एका परिमंडळाची आवश्यकता होती. त्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू होता. त्याअनुषंगाने पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात तिसऱ्या परिमंडळास शासनाने मान्यता दिली. यामुळे आयुक्तालयांतर्गत असलेल्या पोलिस ठाण्यांची तीन परिमंडळांमध्ये विभागणी केली आहे. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त म्हणून संदीप डोईफोडे यांची नियुक्ती केली.
पुणे शहर आणि ग्रामीण पोलिस दलाची विभागणी करून १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. सुरुवातीला १४ पोलिस ठाण्यांचा समावेश असलेल्या आयुक्तालयात दोन परिमंडळांची रचना करण्यात आली. त्यानंतर चिखली, शिरगाव-परंदवडी, महाळुंगे एमआयडीसी, रावेत हे चार पोलिस ठाणे नव्याने सुरू केले. पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील वाढते नागरीकरण, औद्योगिकीकरण, शहरीकरण, शैक्षणिक संस्था, वाहनांची संख्या लक्षात घेता आणखी एका परिमंडळाची गरज निर्माण झाली. त्याअनुषंगाने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करत तिसरे परिमंडळ मंजूर करून घेतले.
शहर पोलिस दलात सध्या १८ पोलिस ठाणे आहेत. तसेच गुन्ह्यांची संख्या जास्त असल्याचे कामाचा अतिरिक्त ताण आहे. तसेच प्रशासकीय कामकाजातही अडचणी येत होत्या. त्यामुळे तिसऱ्या परिमंडळाची आवश्यकता होती. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले.
परिमंडळांची सुधारित रचना
परिमंडळ एक
विभाग - पोलिस ठाणे
पिंपरी - पिंपरी, भोसरी
चिंचवड - चिंचवड, निगडी, सांगवी
परिमंडळ दोन
देहूरोड - तळेगाव एमआयडीसी, तळेगाव दाभाडे, देहूरोड, शिरगाव-परंदवडी
वाकड - रावेत, वाकड, हिंजवडी
परिमंडळ तीन
चाकण - चाकण, महाळुंगे एमआयडीसी, आळंदी
भोसरी एमआयडीसी - दिघी, भोसरी एमआयडीसी, चिखली