पिंपरी-चिंचवड रेल्वे स्थानक : लोकसंख्या सातपट, पुलाची रुंदी तेवढीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 06:51 AM2017-09-30T06:51:21+5:302017-09-30T06:51:33+5:30
पिंपरी-चिंचवड शहर व परिसराची लोकसंख्या सुमारे तीन लाख असताना शहरातून जाणा-या पाच रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल उभारण्यात आले.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर व परिसराची लोकसंख्या सुमारे तीन लाख असताना शहरातून जाणाºया पाच रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल उभारण्यात आले. मात्र, सध्या हीच लोकसंख्या वीस लाखांच्या वर गेलेली असतानाही पादचारी पुलांची रुंदी तेवढीच आहे. शिवाय रेल्वे मार्गावरील पादचारी पुलांची संख्याही वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पाच रेल्वे स्थानके आहेत. यामध्ये पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, कासारवाडी, दापोडी यांचा समावेश आहे. या स्थानकांवर सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. शहराचा विस्तार वाढत असून, लोकसंख्याही वाढत आहे. पुण्यासह इतर ठिकाणी ये-जा करणाºयांमध्ये नोकरदार वर्गासह विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, प्रवास करण्यासाठी अनेकजण
रेल्वेला प्राधान्य देत असल्याने
रेल्वे प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत आहे. एकीकडे प्रवासी संख्या वाढत असताना दुसरीकडे अपुºया सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक वर्षांपूर्वी तीन लाख लोकसंख्येचा विचार करून रेल्वेस्थानकांवर
पादचारी पूल उभारण्यात आले. मात्र, सध्या लोकसंख्येत सात पटीने वाढ झाली असतानाही पुलांची रुंदी तितकीच आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांचे दुर्लक्ष
पादचारी पुलांवर सायंकाळी व सकाळच्या वेळी मोठी गर्दी होते. त्या वेळी तिथे रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी उपस्थित राहून अनुचित प्रकार घडणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रवाशांनीही गर्दीच्या वेळी रांगेने पुढे सरकणे, ढकला ढकली न करणे, उशीर होत असला तरी घाई न करणे आदींची काळजी घेतली पाहिजे.
पार्सल आॅफिसशेजारी दाटीवाटी
पार्सल आॅफिस शेजारील पादचारी पुलाचा वापर प्रवाशांकडून खूप कमी प्रमाणात केला जातो. तिथे पार्सलचे सामान मोठ्या प्रमाणात पडलेले असते, त्याचबरोबर त्या ठिकाणी सामानांची ने-आण करणारे टेम्पो व गाड्या लागलेल्या असतात. त्यामुळे तेथून मोठ्या प्रवासी बॅगा घेऊन चालणे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे प्रवाशांकडून मुख्य पादचारी पुलाचाच जास्त वापर केला जातो.
लोकलची संख्या अपुरी
पुणे ते लोणावळा या ६६ किलोमीटर अंतरावर लोकल धावते. दिवसातून ४२ फेºया होत असून, यामध्ये सुमारे ८० ते ९० हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र, प्रवासी संख्येच्या तुलनेत लोकलची संख्या अपुरी पडत आहे.
नव्या पुलाची मागणी
सकाळी व सायंकाळी लोकलला प्रचंड गर्दी असते. यासह एक्सप्रेस आल्यानंतरही देखील फलाटावर प्रवाशांची गर्दी होते. या वेळी जिन्यातून जात असताना प्रवाशांना अक्षरश: घाम फुटतो. त्यामुळे लोकलची संख्या वाढविण्यासह नव्याने पादचारी पुलांचीही उभारणी करणे आवश्यक बनले आहे.
चिंचवड स्थानकावर भार
शहरातील पाच स्थानकांपैकी चिंचवड रेल्वे स्थानक मोठे आहे. या ठिकाणी कोयना, भुसावळ, सिंहगड, इंदोर, नांदेड, ग्वाल्हेर या एक्सप्रेस थांबतात. त्यामुळे येथे रेल्वेतून चढ-उतार करणाºया प्रवाशांची संख्याही अधिक आहे.
रेल्वे स्थानकांवर स्वयंचलित जिन्यांची आवश्यकता आहे. सध्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत रेल्व ेस्थानकावरील जिन्यांची रुंदी कमी असून, पुलांची संख्याही अपुरी आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
- गुलामअली भालदार,
अध्यक्ष, चिंचवड प्रवासी संघ