पिंपरी-चिंचवडकरांवर ओढवणार पाणीकपातीचे संकट, धरणक्षेत्रात गतवर्षीपेक्षा ६५० मिमी कमी पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 12:51 PM2020-07-16T12:51:03+5:302020-07-16T13:33:17+5:30
पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडलेला नाही
पिंपरी : कोरोना पाठोपाठ आता पिंपरी-चिंचवडकरांवर पाण्याचे संकट ओढवणार असल्याचे दिसून येत असून, पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. गतवर्षी १०७५ मिमी पाऊस पडला होता. त्यातुलनेत यंदा ४२५ मिमी पाऊस पडला आहे. ६५० मिमी कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे दिवसाआड पाण्याचे संकट शहरवासीयांवर राहणार आहे.
औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहरास मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणीवाटप करण्यासाठी २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला होता. अजूनही समाधानकारक पाऊस पडला नाही. पवना धरणक्षेत्रात १ जूनपासून १५ जुलैपर्यंत फक्त ४२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे दीड महिन्यात ५.८४ टक्क्यांनी साठ्यात वाढ झाली आहे. धरणात सध्या ३४.१८ टक्के पाणीसाठा आहे. तर, गतवर्षी आजपर्यंत १०५ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर ४२.१८ टक्के साठा होता. त्यामुळे साडेसहाशे मिमी पाऊस कमी झाला आहे. आठ टक्क्यांनी धरणात साठा कमी आहे.
..........................
तूर्तास कपात वाढविणार नाही
महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे सहायक आयुक्त रामदास तांबे म्हणाले, पवना धरणक्षेत्रात पाऊस पडत आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी आहे, हे वास्तव आहे. परंतु, पवना धरणातील साठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. तूर्तास अतिरिक्त कोणतीही पाणीकपात वाढविली जाणार नाही. ऑगस्टपर्यंत आढावा घेऊन निर्णय घेऊ.
................................
धरणक्षेत्रात कमी पावसाची नोंद
दीड महिन्यात पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही. धरणक्षेत्रात १५जुुलैपर्यंत ४२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दीड महिन्यात ५.८४ टक्क्यांनी साठा वाढला असून, धरणात ३४.१८ टक्के साठा आहे. गतवर्षी धरणात ४२.१८ टक्के साठा होता. गेल्यावर्षी साडेसहाशे मिमी अधिक पाऊस झाला होता. दोन महिने पुरेल एवढा हा साठा आहे. सध्या पाण्याची काटकसर करण्याची आवश्यकता नाही. लॉकडाऊन असल्याने नागरिक घरी आहेत. उद्योग बंद आहेत. पण, घरगुती पाणीवापर वाढला आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांना पाणी कमी पडू दिले नाही.
-एम. ए. गडवाल, शाखा अभियंता, पवना धरण