पिंपरी-चिंचवड आरटीओचे कामकाज मंगळवारपासून सुरू होणार; ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 10:58 PM2021-06-07T22:58:30+5:302021-06-07T22:59:08+5:30
प्रत्येक कामकाजाबाबत ऑनलाईन कोटा निश्चित करण्यात आला आहे.
पिंपरी : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने कठोर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) पक्के तसेच शिकाऊ परवाना, नुतनीकरण आदी कामकाज मंगळवारपासून (दि. ८) मर्यादित स्वरुपात सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कोटा निश्चित करण्यात आला असून, संबंधितांना ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासन आदेशानुसार आरटीओ कार्यालयात कामकाज सुरू करण्यात येत आहे. कार्यालयातील मनुष्यबळाच्या प्रमाणात मर्यादित स्वरुपात ही सेवा सुरू राहणार आहे. त्यात शिकाऊ व पक्के लायसन्स, परवाना नुतनीकरण, त्याची दुय्यम प्रत देणे, वाहन हस्तांतरण, वाहनास नाहरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहन नोंदणी दुय्यम प्रत देणे, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र जारी करणे, कर्ज बाेजा चढविणे व उतरविणे इत्यादी कामकाज तसेच वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करणे व परवाना विषयक कामकाज हे मर्यादित स्वरुपात सुरू करण्यात येणार आहे.
प्रत्येक कामकाजाबाबत ऑनलाईन कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी संबंधितांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यानुसार त्यांना अपॉईंटमेन्ट देण्यात येईल. अर्जदारांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.