पिंपरी-चिंचवड हरित होणे गरजेचे
By admin | Published: July 4, 2017 03:41 AM2017-07-04T03:41:41+5:302017-07-04T03:41:41+5:30
देशात स्मार्ट सिटी होत आहेत. केवळ स्मार्ट सिटी होऊन जमणार नाही. स्मार्ट शहराबरोबर हरित शहर करण्यासाठी पर्यावरणाचा स्मार्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : देशात स्मार्ट सिटी होत आहेत. केवळ स्मार्ट सिटी होऊन जमणार नाही. स्मार्ट शहराबरोबर हरित शहर करण्यासाठी पर्यावरणाचा स्मार्ट विचार घेऊन हरित शहराचा मूलमंत्र शहरातील लोकांपर्यंत पोहचविला पाहिजे. वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. तीन दिवसांत राज्यात एक कोटी ६८ लाख वृक्षांची लागवड केली आहे, असे मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले.
महापालिकेच्या वतीने आयोजित वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात पिंपरी, मिलिटरी डेअरी फार्म येथून झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महापौर नितीन काळजे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, लेफ्टनंट कर्नल अविनाश शर्मा आदी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, ‘‘पैशाने केवळ भौतिक सुख मिळते. मानवाला भौतिक सुखापेक्षा मनाच्या सुखाची गरज जास्त असून, वनराईतून मनाचे समाधान होते. शहराला वृक्षाची नावे दिली जातात. वनाचे संरक्षण होण्यासाठी ही नावे दिली जातात. शुद्ध हवा असेल, तर शुद्ध विचार आणि शुद्ध विचार असेल, तर शुद्ध आचारण होते. जगात प्रत्येक गोष्ट तयार करता येते. परंतु, प्राणवायू तयार करता येत नाही. प्राणवायूसाठी केवळ वडाचे झाड एकमेव यंत्र आहे. अनमोल प्राणवायू देणारे हे यंत्रच आपण तोडत आहोत. वृक्ष तोडणाऱ्या हातांपेक्षा वृक्ष लावणारे हात हजारपट करणे हेच या वृक्षलागवड मिशनचे लक्ष्य आहे.’’
‘वृक्ष लागवडीसाठी सामाजिक संस्था लोकप्रतिनिधी, अपंग नागरिक सहभागी झाले आहेत. लोकांच्या मनात वृक्ष लावण्याच्या मानसिकतेचे बीजारोपण व्हावे, यासाठी हे मिशन आहे. वन विभागाच्या जमिनीवरील ८० टक्के वृक्ष जगले आहेत. इतर विभागांकडे वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी दिली आहे. नकारात्मक भूमिकेपेक्षा वृक्ष वाचविण्याची संख्या वाढवायची आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
मुंबई-पुणे महामार्गावरील वृक्षतोडीबाबत पत्रकारांनी विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, ‘‘महामार्गाच्या कामासाठी वृक्ष तोडण्याची परवानगी दिली जाते. परंतु, ही परवानगी देताना वृक्ष लावण्याचे मिशनदेखील संबंधितांना दिले जाते. जिथे गरज आहे. तेथील वृक्ष तोडावे लागतात.’’
पिंपरीतील कार्यक्रमाची वेळ तीनची होती. कार्यक्रमस्थळी गर्दी जमावी या उद्देशाने एका शाळेचे विद्यार्थी दुपारी दोनपासूनच उपस्थित होते. मुख्य कार्यक्रम दीड तास उशिराने सुरू झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना ताटकळावे लागले.
चार कोटी
वृक्ष लागवड करणार
मुनगंटीवार म्हणाले, ‘‘पर्यावरण टिकविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. परंतु, दुसरे कोण करेल असा विचार न करता मी करेल, असा विचार घेऊन काम करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राला हरित महाराष्ट्र घडविण्याचे उद्दिष्ट आहे.
या वर्षी चार कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य आहे. तर पुढील वर्षी १३ कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य आहे. तसेच नागरिकांनी ग्रीन आर्मीचे सदस्य व्हावे. जिथे कुठे वृक्षाची अवैध तोड होत असेल, तर १९२६ या हॅलो फॉरेस्टवर कॉल करून पर्यावरणाचे सेनापती व्हावे.’’