पिंपरी चिंचवड शहरातील नाल्यांच्या सफाईचा दिखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 03:21 AM2018-05-08T03:21:03+5:302018-05-08T03:21:03+5:30
‘स्मार्ट सिटी’, ‘पॅन सिटी’ आणि आता ‘मेट्रो’ सिटी होऊ घातलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांची साफसफाई करण्याची लगबग दरवर्षीप्रमाणे सुरू आहे. मात्र ‘नेहमीची येतो पावसाळा’ या मानसिकतेतून हे काम करण्यात येते. त्यामुळे वरवर सफाई झाल्याचे चित्र प्रत्येक पावसाळ्यात स्पष्ट होते.
पिंपरी : ‘स्मार्ट सिटी’, ‘पॅन सिटी’ आणि आता ‘मेट्रो’ सिटी होऊ घातलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांची साफसफाई करण्याची लगबग दरवर्षीप्रमाणे सुरू आहे. मात्र ‘नेहमीची येतो पावसाळा’ या मानसिकतेतून हे काम करण्यात येते. त्यामुळे वरवर सफाई झाल्याचे चित्र प्रत्येक पावसाळ्यात स्पष्ट होते. यंदाही सफाईला सुरुवात झाली असली तरी, अपुरे मनुष्यबळ आणि उदासीन मानसिकता याचा प्रत्यय या कामातून येत आहे. ‘लोकमत पाहणी’तून या कामाचा घेतलेला हा आढावा...
दिघी : परिसरातील नाल्यांचे कॉँक्रीटीकरण झाले असले, तरी नाल्यांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत. झाडांच्या फांद्या, वाढलेले गवत, चेंबरवर नसलेले झाकण, तर काही ठिकाणी टाकलेला मातीचा भराव यामुळे येत्या पावसाळ्यात पावसाच्या पाण्याला अडथळा होऊन रस्त्यावर तळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दिघी ओढ्याजवळील नाल्यात जमा केलेल्या कचºयाचे ढीग लावून तसेच पडून आहेत. येथील नाल्याचे बांधकाम करून चेंबर बांधली आहेत. मात्र या चेंबरवरील बरीच झाकणे गायब आहेत. भोसरी-आळंदी रस्त्याच्या पलीकडील वाळके मळ्याकडून येणाºया नाल्यात वाहिनी टाकून चेंबर बांधली गेली. मात्र त्याचे कॉँक्रीटीकरण झाले नाही. वाढलेल्या गवताचा व झाडाझुडपांचा अडथळा होत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाल्यांची साफसफाई होणे आवश्यक आहे. या नाल्यांची उंची कमी असल्याने जास्त प्रमाणात पाऊस कोसळला, तर रस्त्यावर पाणी येऊन वाहनचालकांची वाट काढताना भंबेरी उडते. यापूर्वी अशी परिस्थिती वारंवार पावसाळ्यात ओढवत होती. त्यामुळे प्रशासनाने नाल्याचे बांधकाम करून प्रशस्त नाले बांधले आहेत.
विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे छत्रपती संभाजीमहाराज चौकाकडे जाणाºया रस्त्यावर मागच्या पावसाळ्यात पावसाचे पाणी तुंबल्याने रस्त्यावर गटारगंगा अवतरली होती. मातीचा भराव टाकल्याने या परिसरातील पावसाचे पाणी व गटारातील पाणी एकत्रितपणे रस्त्यावर साचते. दिघीतील गटारातील पाणी स्मशानभूमीच्या बाजूला लष्करी हद्दीतील मोकळ्या जागेत जमा होत आहे. शिवाय पावसाचे पाणी वाहून येथेच जमा होते.
नाल्यातील सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
जाधववाडी : जाधववाडीतील कृष्णानगर, रंगनाथनगर येथील नाल्यात कचºयातून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक जमा होत आहे. नाल्यात अधिक प्रमाणात प्लॅस्टिक असल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होत नाही. तसेच या नाल्यात सांडपाणी सोडण्यात येते़ त्यामुळे येथे पाणी साचून दुर्गंधी येते. नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका कर्मचारी नालेसफाईकरिता फिरकत नसल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. केवळ पावसाळ्यापूर्वीच नाले सफाई केली जाते. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नाल्यातील अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण अधिक वाढले आहे. या भागातील जलवाहिन्या जुन्या झाल्याने जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे या जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती असल्याचे दिसून येते. नाल्यांजवळ असलेल्या जलवाहिन्यांमध्ये नाल्यातील सांडपाणी मिसळते. त्यामुळे जलवाहिनीतून दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणीपुरवठा होतो. त्यामुळे अशा जीर्ण जलवाहिन्या बदलाव्यात आणि त्यांची गळती थांबविण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे. नाल्यांमध्ये सांडपाणी सोडण्यात येऊ नये म्हणून सांडपाणी वाहिन्यांची गरज आहे. त्याबाबत उपाययोजना करण्याचीही मागणी नागरिकांतून होत आहे. सांडपाणी थेट नाल्यांमध्ये सोडण्यात आल्याने नाल्यांमध्ये डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. याला आळा घातला पाहिजे. त्यासाठी नाल्यांची साफसफाई करण्यात येऊन परिसरात धूर फवारणी केली जावी, अशी मागणी कृष्णानगर व रंगनाथनगरमधील नागरिक करीत आहेत.
प्रभाग पद्धतीनुसार कामे होत असल्याने दिरंगाई
लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचवड : पावसाळा सुरू होण्याआधी महापालिकेने चिंचवडमधील काही नाल्यांची साफसफाई करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. मात्र, प्रभागपद्धतीनुसार ही कामे होत असल्याने काही नाल्यांची अर्धवट कामे झाली आहेत. नाल्याच्या दुर्गंधीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. उर्वरित भागातील नालेसफाई त्वरित पूर्ण करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
चिंचवडमधील काही भाग ‘अ’ प्रभाग कार्यालयांतर्गत आहे तर काही भाग ‘ब’ प्रभाग कार्यालयात आहे. पांढारकरनगर भागातून प्रेमलोक पार्क, एसकेएफ कॉलनी, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह मार्गे जाणारा नाला हा चिंचवडमधील मोठा नाला आहे. प्रेमलोक पार्क परिसरात या नाल्यामुळे दुर्गंधी पसरल्याचे व मच्छर होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत होते. आरोग्य विभागाने याची दखल घेत ५ एप्रिलपासून १० कर्मचारी व जेसीबीच्या साह्याने साफसाफाई सुरू केली. पांढारकर नगर ते प्रेमलोक पार्कपर्यंत या नाल्याची साफसफाईची कामे पूर्ण होत आली आहेत. नाल्यातील अडथळे हटवून झाडे झुडपे काढण्यात आली असून, नाला स्वच्छ करण्यात आला आहे. स्थानिक नगरसेविका माधुरी कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून येथील नाला स्वच्छ करण्यात आला आहे. यामुळे नाल्याचा कायापालट झाल्याचे वास्तव सध्या दिसत आहे.
प्रेमलोक पार्कच्या पुढील भाग हा ‘अ’ प्रभागांतर्गत येत असल्याने या भागातील साफसफाई करण्यात आलेली नाही.
चिंचवड वाहतूक शाखा कार्यालयाच्या मागील बाजूस असणाºया नाल्यात झाडे झुडपे वाढली आहेत. या ठिकाणी वारंवार कचरा जाळण्याचा प्रकार होत असतो. मात्र याबाबत महापालिका प्रशासन दखल घेत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. चिंचवड स्टेशन जवळील उद्योगनगर भागात असणाºया नाल्याची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी झाडे झुडपे वाढली असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. काळभोरनगर परिसरातून येणारा हा नाला सुदर्शननगर, तानाजीनगर भागातून जात आहे. या नाल्याचा काही भाग बंदिस्त तर काही भाग सिमेंटने बांधलेला आहे. पावसाळ्यापूर्वी याची साफसफाई पूर्ण करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
सांगवीत पुरेशा मनुष्यबळाचा अभाव
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगवी : पावसाळ्यापूर्वीच नाल्यांची सफाई करण्यात यावी, अशी सांगवी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. त्यानुसार महापालिकेकडून नाले आणि पावसाळी पाणी वाहून नेणाºया गटारांची सफाई करण्यात येत आहे. असे असले तरी पुरेसे मनुष्यबळ असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नाले आणि गटारी सफाईस दिरंगाई होण्याची शक्यता आहे. काही नाले आणि गटारी साफ असल्याचे दिसून येते. मात्र काही लहान गटारी अद्यापही साफ झालेल्या नाहीत. त्यांची सफाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
सांगवी आणि परिसरातील भागात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि स्वच्छता याकडे महापालिका आरोग्य विभागाने वेळेपूर्वी लक्ष दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसाळा सुरू होण्या अगोदर परिसरातील पवना व मुळा नदीकडे परिसरातील पाणी वाहून नेणारे नाले आणि छोट्या मोठ्या गटारी सफाईचे महापालिकेच्या ‘ह’ प्रभागाच्या आरोग्य विभागातील अधिकाºयांनी वेळीच सुरू केल्याने पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु अनेक भागातील नालेसफाई होणे गरजेचे असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी छोट्या गटारी व नाले अजूनही स्वच्छ झालेले नाहीत. ऐन पावसाळ्यात महापालिका ही कामे करणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
रहाटणी, पिंपळे सौदागरमधील नालेसफाई कधी?
लोकमत न्यूज नेटवर्क
रहाटणी : पावसाच्या आगोदर पिंपरी-चिंचवड शहरातील छोटे मोठे नाले साफ व्हावेत म्हणून पालिका आयुक्तांनी अधिकाºयांसह ठेकेदारांनाही तंबी दिली आहे. पावसाच्या अगोदर शहरातील नाले साफ करावेत, असे आदेश देताच शहरातील काही नाले घाई घाईत साफ करण्यात येत आहेत. मात्र या आदेशाचा काही क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाºयांना देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील नाले सफाईला अद्याप मुहूर्त लागला नाही. सदरील परिसरातील नाल्यात मोठ्या प्रमाणात गवत आणि घाण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सध्या शहरात अवकाळी पावसाची चाहूल जाणवू लागली आहे. मागील आठवड्यापासून वाºया वादळासह पावसाची हजेरी लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रहाटणी, काळेवाडी व पिंपळे सौदागर परिसरात अनेक उघडी गटारी नाले आहेत. त्या नाल्यात मोठ्या प्रमाणात गवत, झाडे झुडपे वाढली आहेत तर काही नाल्यात गाळ साचला असल्याने ठिकठिकाणी गटारीचे घाण पाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिसरातील या गटारी नाल्याच्या शेजारी नागरी वस्ती असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या शहरात स्वाइन फ्लू सारख्या आजाराने थैमान घातले आहे. दुसरीकडे डासांचा प्रादुर्भाव वाढला