पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायी समितीच्या रिक्त आठ सदस्यांची झाली निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 02:49 PM2018-02-28T14:49:54+5:302018-02-28T14:49:54+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ सदस्यांची आज बुधवारी सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ सदस्यांची आज बुधवारी सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये रिक्त झालेल्या पक्षाच्या संख्याबळानुसार भाजपाच्या सहा आणि राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये भाजपकडून विलास मडीगेरी, राहुल जाधव, शीतल शिंदे, ममता गायकवाड, नम्रता लोंढे, सागर अंगोळकर तर राष्ट्रवादीकडून गीता मचरकर, प्रज्ञा खानोलकर या दोघीची स्थायीत वर्णी लागली आहे. महापौर नितीन काळजे यांनी स्थायी समितीत नियुक्ती झाल्याची घोषणा केली. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्षपदाची माळ नगरसेवक विलास मडीगेरी यांच्या गळ्यात पडणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.
पिंपरी महापालिका स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा असतो. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. तेवढेच सदस्य पुन्हा नव्याने निवडले जातात. त्यानुसार स्थायीमधील आठ सदस्य चिठ्ठीद्वारे बाहेर पडले आहेत. त्यात अध्यक्षा सीमा सावळे यांचा देखील समावेश आहे. भाजपचे सहा आणि राष्ट्रवादीच्या दोन महिला नगरसेविका बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या.
सभागृह नेते एकनाथ पवार यांनी भाजपच्या तर विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची नावे बंद पाकिटातून महापौर नितीन काळजे यांच्याकडे दिली. त्यानंतर संबंधितांची नावे वाचून स्थायी समितीत नियुक्ती झाल्याची घोषणा महापौर काळजे यांनी केली.
दरम्यान, स्थायी समिती अध्यक्षपदाची माळ आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले नगरसेवक राहुल जाधव यांच्या गळ्यात पडण्याची दाट चिनहे होति. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी राहुल जाधव, शितल शिंदे आणि विलास मडीगेरी यांच्यात चूरस आहे. अध्यक्षपदाची माळ नगरसेवक विलास मडीगेरी यांच्या गळ्यात पडणार असल्याचे निश्चित आहे.