पिंपरी चिंचवड : निलंबित पीएमपी कर्मचा-याची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 01:41 PM2018-02-14T13:41:10+5:302018-02-14T13:44:04+5:30
पीएमपीमध्ये चालक पदावर काम करणा-या कर्मचा-याने छताच्या पंख्याला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भोसरी येथील ही घटना आहे.
पिंपरी चिंचवड - पीएमपीमध्ये चालक पदावर काम करणा-या कर्मचा-याने छताच्या पंख्याला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भोसरी येथील ही घटना आहे. मंगळवारी (13 फेब्रुवारी) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तुकाराम मुंडकर (वय 42 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. कामावरून निलंबित केल्याच्या नैराश्येतून तुकाराम मुंडकर यांनी आयुष्य संपवल्याची चर्चा केली जात आहे.
मात्र, आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. तुकाराम मुंडकर यांना दोन महिन्यांपूर्वीच कामावरून निलंबित करण्यात आले होते. पीएमपीच्या 128 कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात चालक पदावर काम करणा-या मुंडकर यांचाही समावेश होता. कामावरून कमी केल्यामुळे ते निराश झाले होते.
त्यांची पत्नी मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास बहिणीकडे गेल्या होत्या. त्याचवेळी मुंडकर यांनी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास छताच्या पंख्याला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. पत्नी घरी आली असता हा प्रकार त्यांच्या उघडकीस आला. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.