पिंपरीत निर्बंध शिथिल झाल्यावर वाहनचोरटे झाले ‘अनलाॅक’; दुचाकीसह पळविल्या दोन रिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 07:01 PM2021-06-10T19:01:43+5:302021-06-10T19:01:50+5:30
अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल
पिंपरी: कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यात वाहनचोरटेही ‘अनलॉक’ झाले आहेत. शहरातून एका दुचाकीसह दोन रिक्षा चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात वाहन चोरट्यांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये बुधवारी गुन्हे दाखल केले आहेत.
माधुरी किशोर जाधव (वय २२, रा. खंडोबा माळ, आकुर्डी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जाधव यांनी त्यांची रिक्षा त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती रिक्षा चोरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार सोमवारी पहाटे साडेपाचला उघडकीस आला.
सुनील अलबर्ट साठे (वय ६२, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. साठे यांनी त्यांची रिक्षा घराजवळ मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती रिक्षा चोरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार बुधवारी उघडकीस आला.
राहुल मोजिल बिश्वास यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बिश्वास यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पंचतारानगर, आकुर्डी येथील एका किराणा दुकान समोरून चोरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार रविवारी घडला.