Pimpri Chinchwad: सावधान! आता ५ हजार कॅमेऱ्यांची नजर, गुन्हेगारी व वाहतूककोंडी रोखण्यासाठी प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 03:34 PM2023-09-26T15:34:01+5:302023-09-26T15:37:55+5:30
गाड्यांचे नंबरप्लेट ओळखणार कॅमेरा...
पिंपरी : नागरिकांची सुरक्षा, गुन्हेगारी आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या वतीने शहरामध्ये विविध ठिकाणी सुमारे ५ हजाराहून अधिक कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे सावधान आता गुन्हेगारांवर आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष असणार आहे.
निगडी येथील आयसीसीसी सेंटर येथे आढावा बैठक झाली. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. केंद्र शासनाच्या मुदतीत प्रकल्प पूर्ण करा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. यावेळी शहर अभियंता मकरंद निकम, सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, शहर सह अभियंता मनोज सेठीया, बाबासाहेब गलबले, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे उपस्थित होते.
वाहतुकीच्या वेगाची होणार नोंद
वाहतुकीच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड व्हायलेशन डिटेक्शन सिस्टम सिंक्रोनाइजचा अवलंब करण्यात आला आहे. शहरात १६ ठिकाणी हे कॅमेरे लावले आहेत. सिग्नल ओलांडलेल्या वाहनांची नंबर प्लेट आणि वेग पकडण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे. अतिवेगवान वाहनासाठी स्वयंचलित अलार्म निर्माण करण्यास सिस्टीम सक्षम आहे.
रेड लाइट व्हायलेशन डिटेक्शन सिस्टम
शहरातील २३ ट्रॅफिक जंक्शनवर लाल सिग्नलचे उल्लंघन रोखण्यासाठी ही प्रणाली तयार केली आहे. लाल सिग्नलचे उल्लंघन करणारऱ्या वाहनांचा फोटो घेऊन त्याचे चलन तयार होईल. यामुळे, सिग्नलवरील झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन थांबण्यास मदत होईल. लाल सिग्नलवरील सिस्टीमच्या कॅमेऱ्याद्वारे या सिग्नलवरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांच्या नंबरप्लेटची नोंद घेऊन डेटा संकलित केला जाईल. सिग्नल, क्रॉसरोड आणि यू-टर्न वाहतूक पोलिसांशिवाय चालतील.
गाड्यांचे नंबरप्लेट ओळखणार कॅमेरा
एएनपीआर कॅमेरा हा नंबरप्लेट ओळखणारा कॅमेरा आहे. या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो वाहनांच्या नंबरप्लेट वाचून आपोआप चलन काढणे. एवढेच नाही तर कमांड कंट्रोल रूममध्ये बसलेले पोलिस या कॅमेऱ्याच्या मदतीने रस्त्यावर लक्ष ठेवून नियम मोडणाऱ्यांना चलन देऊ शकतात. एएनपीआर कॅमेरा गुन्हेगारांची छायाचित्रे घेतो आणि त्यात बसवलेल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने गुन्हेगारांचे तपशील जवळपास तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना पाठविता येणार आहे.