पिंपरी-चिंचवडसाठी मुळशी धरणातून ७६० दशलक्ष लिटर पाणी आरक्षित करावे;आमदार जगताप यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 13:26 IST2025-03-13T13:25:33+5:302025-03-13T13:26:53+5:30
धरणातून आउटलेटद्वारे बाहेर जाणाऱ्या पाण्याच्या मोजमापासाठी मीटर बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पिंपरी-चिंचवडसाठी मुळशी धरणातून ७६० दशलक्ष लिटर पाणी आरक्षित करावे;आमदार जगताप यांची मागणी
पिंपरी : महापालिकेच्या वाढत्या लोकसंख्येला आवश्यक पाणीपुरवठा मिळावा आणि मुळशी धरणातून ७६० दशलक्ष लिटर पाणी आरक्षित करावे, अशी मागणी आमदार शंकर जगताप यांनी केली आहे.
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी आमदार महेश लांडगे, जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुनाले, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि आयुक्त शेखर सिंग, सहशहर अभियंता प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता दीपक पाटील उपस्थित होते. या मागणीवर उत्तर देताना जलसंपदामंत्र्यांनी पाण्याच्या वापराचे ऑडिट करण्याचे निर्देश दिले.
मुळशी धरणातील गाळ काढण्याचे आणि धरणाच्या देखभालीसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना महापालिकेच्या आयुक्तांसोबत बैठक घेऊन सांडपाण्याच्या पुनर्वापरासंबंधी पाण्याच्या स्रोतांचे ऑडिट करण्याचे निर्देश दिले. धरणातून आउटलेटद्वारे बाहेर जाणाऱ्या पाण्याच्या मोजमापासाठी मीटर बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीत आमदार शंकर जगताप म्हणाले, “शहराच्या विस्तारासोबतच गहुंजे, जांबे, मारुंजी, हिंजवडी, मान, नेरे आणि सांगवडे या सात गावांचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याची मागणी आणि तुटवडा होणार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महापालिकेला पुरेसे पाणी मिळावे, यासाठी पुढील स्तरावर अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होणार आहे.