पिंपरी-चिंचवड: व्यवसायाच्या आमिषाने महिलेची ३० लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 11:00 AM2021-11-29T11:00:42+5:302021-11-29T11:01:20+5:30
पिंपरी : व्यवसायातून पैसे कमावण्याचे आमिष दाखवून एका महिलेची २९ लाख ८० हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा ...
पिंपरी : व्यवसायातून पैसे कमावण्याचे आमिष दाखवून एका महिलेची २९ लाख ८० हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. स्पाईन रोड, चिखली येथे जुलै ते २३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
मनीषा भगवान घाडगे (वय ३७, रा. स्पाईन रोड, चिखली) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अश्विनी ललित चौधरी (रा. चिंचवड), ललित विश्वनाथ चौधरी, निकिता समाधान पाटील, समाधान भागवत पाटील (रा. बिजली नगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला व्यवसाय करण्याचे आमिष दाखवले. होलसेल दरामध्ये वाडा, कोलम तांदूळ, उडीद पापड, तूर डाळ, ढोकळा पीठ, काळे उडीद डाळ, पांढरी उडीद डाळ खरेदी करायची आणि ती चढ्या दराने डी मार्टला विकायची. त्यातून पैसे कमावू, असे आरोपींनी फिर्यादीला आमिष दाखवले. आरोपींनी डी मार्टच्या पर्चेसिंग ऑर्डर फिर्यादीला दाखवल्या. व्यवसायासाठी फिर्यादीकडून पैसे घेतले. फिर्यादीची २९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.