एका रेशनिंग कार्यालयावर पिंपरी-चिंचवडकरांचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 02:58 AM2019-01-30T02:58:16+5:302019-01-30T02:58:39+5:30
नागरिकांची होतेय गैरसोय, ‘अ’ व ‘ज’ परिमंडल; कामकाजावर येतोय ताण
- मंगेश पांडे
पिंपरी : अन्नधान्य व पुरवठा विभागाच्या ‘अ’ (चिंचवड विधानसभा) व ‘ज’ (पिंपरी विधानसभा) या दोन परिमंडल विभागाचे कामकाज सध्या एकाच कार्यालयातून सुरु असल्याने येथील कामकाजावर ताण येत आहे. यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या दोन्ही कार्यालयाचा कारभार स्वतंत्र करण्याचे नियोजित आहे. मात्र, त्यास अद्यापही मुहुर्त लागलेला नाही.
रेशनिंग कार्यालयाच्या परिमंडल कार्यालयांची रचना विधानसभानिहाय करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी एक कार्यालय आहे. मात्र, पिंपरी व चिंचवड हे विधानसभा संघ मिळून एकत्रितच कार्यालय आहे. यामुळे येथील कामकाजावर ताण येत आहे.
निगडीतील संत तुकाराम व्यापार संकुलाच्या इमारतीत सध्या ‘अ’ आणि ‘ज’ विभागाचे एकत्रित कार्यालय आहे. ‘अ’ विभागात चिंचवड विधानसभेतील ९७ तर ‘ज’ विभागात पिंपरी विधानसभेतील ८३ रेशन दुकानदारांचा समावेश आहे. ‘अ’ विभागात म्हणजेच चिंचवड विधानसभा मतदार संघात २९ हजार ५२४ कार्डधारक आहेत. तर ‘ज’ विभागात म्हणजेच पिंपरी विधानसभा मतदार संघात ८३ हजार ३१६ कार्डधारक आहेत. या दोन्ही मतदार संघातील कामकाज एकाच कार्यालयात केले जात असल्याने कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. तसेच यामुळे कामकाजावरही परिणाम होतो.
नवीन शिधापत्रिका काढणे, नावात दुरुस्ती करणे आदी कामांसाठी निश्चित वेळेपेक्षा अधिक वेळ लागतो. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, ‘अ’ आणि ‘ज’ विभागासाठी स्वतंत्र परिमंडल कार्यालय सुरु करण्याचे नियोजित आहे.
स्वतंत्र कार्यालयाची मागणी
पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदार संघ आहेत. यामध्ये भोसरी विधानसभेसाठी ‘फ’ परिमंडल अधिकारी कार्यालय आहे. हे कार्यालय लवकरच भोसरीतील पांजरपोळ येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीतच सुरु करण्यात येणार आहे. याच धर्तीवर ‘अ’ आणि ‘ज’ परिमंडल अधिकारी कार्यालयही लवकरच स्वतंत्र सुरु करावेत, अशी मागणी होत आहे.
सध्या एकाच कार्यालयात ‘अ’ व ‘ज’ विभागाचे कामकाज सुरु आहे. उपलब्ध मनुष्यबळात दोन्ही विभागाचे कामकाज केले जाते. दोन्ही विभाग स्वतंत्र झाल्यास कामाचा भार हलका होण्यास मदत होईल. - दिनेश तावरे,
परिमंडल अधिकारी, ‘अ’ व ‘ज’ विभाग.