‘पुणेरी पाट्यां’साठी पिंपरी-चिंचवडकरांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 02:34 AM2018-07-10T02:34:18+5:302018-07-10T02:34:28+5:30
भर पावसातही रांग लावून पिंपरी-चिंचवडकरांनी ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या पुणेरी पाट्यांच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चिंचवडगाव येथील गंधर्व हॉलमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही अफाट गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले.
पिंपरी : भर पावसातही रांग लावून पिंपरी-चिंचवडकरांनी ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या पुणेरी पाट्यांच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चिंचवडगाव येथील गंधर्व हॉलमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही अफाट गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. उपहास, उपरोध, तिरकसपणा, त्याचबरोबर मिश्किलपणा, अचाट कल्पनाशक्ती म्हणजे पुणेरी पाट्या हे वैशिष्ट्य पिंपरी-चिंचवडकरांना अनुभवण्यास मिळाले.
बौद्धिक कौशल्य, टोमणे आणि उपदेशांचे माहेरघर म्हणजे पुणे होय. इरसाल, मार्मिक, हळूच चिमटा काढणाºया पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन पुण्यात कोथरूडमध्ये झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडकरांच्या आग्रहास्तव हे प्रदर्शन चिंचवडमध्ये भरविण्यात आले. त्यास दोन्ही दिवस रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. रविवारी सुटीच्या दिवशी तर उद्घाटन होण्याची प्रतीक्षा न करताच, थेट दालनात अनेकजण प्रदर्शन पाहण्यासाठी वेळेपूर्वीच हजर होते. दुस-या दिवशी सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप असतानाही रिक्षाने, स्वत:च्या वाहनाने सहकुटुंब येऊन नातवापासून ते आजी-आजोबांनी प्रदर्शन पाहण्याचा आनंद घेतला.
‘लोकमत’तर्फे कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वलर्स व मेन्स अॅव्हेन्यूच्या सहकार्याने आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे नगरसेवक राहुल कलाटे व राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज व आइस्क्रीम पार्टनर खत्री बंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी हे सहप्रायोजक होते. धीरेंद्र आउटडोअर मीडिया सोल्युशन्स प्रा. लि. हे कार्यक्रमाचे आउटडोअर पार्टनर, तर कर्तव्य फाउंडेशन हे व्हेन्यू पार्टनर होते.
प्रदर्शनस्थळी दाखल झालेले अनेकजण आपल्या मोबाइलमध्ये पुणेरी पाट्यांचे फोटो काढून मित्रांना व्हॉट्स अॅपवर पाठवत होते. गर्दी वाढतच होती. महापालिकेचे महापौर नितीन काळजे, अधिकारी व आजी-माजी नगरसेवकांनीही या प्रदर्शनास आवर्जून भेट दिली. पुणेरी पाट्यांचे शहरात भरलेले हे पहिलेच प्रदर्शन होते. त्यास पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्यांच्यातील रसिकतेचे दर्शन घडविले.
चापेकर चौकातील पुलापर्यंत रांगा
पुण्यातील अभूतपूर्व प्रतिसादानंतर चिंचवड येथे आयोजित केलेल्या पुणेरी पाट्या प्रदर्शनास पिंपरी-चिंचवडकरांनी अफाट गर्दी केली होती. गंधर्व हॉलपासून चापेकर चौकातील पुलाखाली रांगा लागल्या होत्या. सकाळी ११ला प्रदर्शन खुले होताच नागरिक
गंंधर्व हॉलच्या दिशेने येऊ
लागले. दुपारी १२ नंतर गर्दी वाढत गेली. पावसाची रिपरिप सुरू असतानाही गर्दीवर काही परिणाम जाणवला नाही.
व्हॉट्सअॅपवर पाऊस!
सर्व वयोगटांतील पुणेकरांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. आपल्या आवडत्या पाटीसह सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. पाट्यांची छबी मनावर उमटत असतानाच मोबाइलमध्येही चित्रबद्ध करण्यात येत होती.
पुणेरी पाटी म्हणजे काय गं आई?
पुणेरी पाट्यांची खासियत पुढील पिढीला समजावून सांगण्यासाठी अनेक पालक सरसावले होते. ‘पुणेरी पाटीवरचा मजकूर म्हणजे व्हॉट्सअॅपवर सर्रास न वाचता फॉरवर्ड केले जाणारे मेसेज नव्हेत.
पुणेरी पाट्या लिहिण्यासाठी अफाट बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलताच असावी लागते’, अशा शब्दांत पालकांनी ही खासियत अभिमानाने अधोरेखित केली. ‘पाट्या वाचल्यानंतर तुला काय वाटते, ते बाहेरच्या फळयावर लिही’ असे सांगत पालक मुलांच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देताना दिसले.