पिंपरी चिंचवडकरांनो पाणी जपूनच वापरा! पवना धरणात ११.८० टक्के पाणी, पाणीसाठा घटला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 12:42 PM2024-06-17T12:42:27+5:302024-06-17T12:43:30+5:30

‘उद्योगनगरीवासीयांनो, काटकसरीने पाण्याचा वापर करा.’ वेळीच सावध व्हा; अन्यथा गत्यंतर नाही, हे सांगण्याची वेळ आली आहे.....

Pimpri Chinchwadkars use water sparingly! 11.80 percent water in Pavana dam, water storage decreased | पिंपरी चिंचवडकरांनो पाणी जपूनच वापरा! पवना धरणात ११.८० टक्के पाणी, पाणीसाठा घटला

पिंपरी चिंचवडकरांनो पाणी जपूनच वापरा! पवना धरणात ११.८० टक्के पाणी, पाणीसाठा घटला

पिंपरी : गेल्या वर्षी चांगला पाऊस न झाल्याने पवना धरणक्षेत्रात पाण्याचा कमी साठा झाला. यंदा मान्सून वेेळेवर आला असला, तरी म्हणावा तसा पाऊस सुरू झालेला नाही. धरण परिसरातही अजून तरी चांगला पाऊस पडलेला नाही. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीपातळी खालावली असून, केवळ १९.८० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ‘उद्योगनगरीवासीयांनो, काटकसरीने पाण्याचा वापर करा.’ वेळीच सावध व्हा; अन्यथा गत्यंतर नाही, हे सांगण्याची वेळ आली आहे.

मावळ आणि मुळशी परिसरात चांगला पाऊस होत असतो. यंदा मात्र, अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. जून आणि पुढील महिन्यात पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. सध्या तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पाणीसाठा कमी आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात गेल्या वर्षी ५.४८ टीएमसी पाणीसाठा होता. त्या वेळी उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण १८.७८ टक्के इतके होते. यंदा पुणे जिल्ह्यात शंभर टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिलेला आहे. तर देशात १०६ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु, सध्यातरी धरणांतील पाणीसाठा जपून वापरावा लागणार आहे.

शहरात पाऊस, धरण क्षेत्रात गायब!

यंदा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे साठ्यात वाढ पाहायला मिळाली नाही. मान्सून वेळेवर आला असला, तरी त्यात दम नसल्याने म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. पिंपरी चिंचवड, पुणे शहरात आणि जिल्ह्यातील शिरूर, इंदापूर, बारामती, दौंड या भागांत पावसाने हजेरी लावली. शहरात ५ जूनपासून आतापर्यंत २०६ मिमी पावसाची नोंद झाली. जी सरासरी पावसाहून अधिक आहे. हा पाऊस १३५ टक्के झाला आहे. गेल्या वर्षी पवना धरणामध्ये याच वेळी २०.१६ टक्के पाणीसाठा होता. या वर्षी पवना धरणात १९.८० पाणीसाठा आहे. धरण क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी २१ मिमी पाऊस झाला होता.

धरणसाखळीत पाणीसाठा कमी

मुठा खोऱ्यामधील चार धरणांची एकूण पाण्याची उपयुक्त क्षमता २९.१५ टीएमसी आहे. सध्या या चारही धरणांमध्ये मिळून ३.७६ टीएमसी पाणी आहे. गतवर्षी जेमतेम झालेल्या पावसामुळे खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत ही धरणे कशीबशी भरली होती. गतवर्षी परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्यामुळे खडकवासला प्रकल्पात कमी पाणीसाठा झाला.

पाणीसाठा (टीएमसी)

धरण - आताचा साठा - गतवर्षीचा साठा

टेमघर - ०.०५ - ०.१४

वरसगाव - १.४४ - २.७४

पानशेत - १.४६ - १.३७

खडकवासला - ०.८१ - १.२३

पवना धरणामध्ये आजअखेरीस १९.८० टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा महिना अखेरपर्यंत पुरेल असा अंदाज आहे. पाऊस लांबणीवर गेल्यास पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो. मात्र, समाधानकारक पाऊस होईल, अशी अपेक्षा आहे.

- राजेश बरिया, पवना धरण अभियंता

जून आणि जुलै महिन्यांमध्ये पावसात दोन खंड पडणार आहेत. या दोन महिन्यांत पाऊस कमीच असेल. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्येही पावसाची कमतरता भरून निघेल. कारण या दोन महिन्यांत चांगला पाऊस होईल. कमी वेळेत अधिक पाऊस असा पॅटर्न पावसाचा पाहायला मिळत आहे.

- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ

Web Title: Pimpri Chinchwadkars use water sparingly! 11.80 percent water in Pavana dam, water storage decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.