पिंपरी चिंचवडच्या गुंडांची फलटणमध्ये हत्या, वाकड पोलिसांनी संशयिताला घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 03:04 PM2017-12-05T15:04:16+5:302017-12-05T15:04:23+5:30
सराईत गुन्हेगार सचिन शेटे उर्फ ठाकूर याची फलटण (सातारा) येथे डोक्यात दगड घालून अज्ञातांनी हत्या केली आहे.
पिंपरी- सराईत गुन्हेगार सचिन शेटे उर्फ ठाकूर याची फलटण (सातारा) येथे डोक्यात दगड घालून अज्ञातांनी हत्या केली आहे. हत्या झालेली व्यकती ही सराईत गुन्हेगार असल्याचे वाकड पोलिसांनी केलेल्या तपासात निदर्शनास आलं. या प्रकरणातील एका संशयिताला वाकड पोलिसांनी अटक केली असून सुशील शिंदे असं त्याचं नाव आहे.
वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण येथे आढळून आलेला मृतदेह सचिन शेटे या सराईत गुन्हेगाराचा असल्याचे निष्पन्न झालं.
वाकड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे १४ गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात त्यास अटक झाली होती. पण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तो या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता. त्याच्यावर विविध ठिकाणी दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, दहशत माजविणे, खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे १३ गंभीर गुन्हे त्याने वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआगोदरच केले वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याने एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यातून तो जामिनावर बाहेर आला होता. दरम्यानच्या काळात त्याचा खून झाला आहे.
या प्रकरणी काळेवाडी येथून सुशील शिंदे या संशयिताला वाकड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून गुन्ह्यात वापरलेली मोटारही पोलिसांनी जप्त केली आहे. फलटण येथे सचिन शेटे या सराईत गुन्हेगाराला मारून टाकण्यात आले. पिंपरी चिंचवड येथून फलटणला जे लोक गेले. त्यांच्याबरोबर वाहन चालविण्यासाठी गेल्याचे सुशिल शिंदे याने वाकड पोलिसांना सांगितले. केवळ वाहन चालविण्यासाठी गेलो. सातारा येथे त्यांना सोडले, पुन्हा दुसऱ्या वाहनाने परतलो. फलटणमध्ये काय झाले? शेटे याला कोणी मारले? याबद्दल काही माहिती नसल्याचे त्याने सांगितले. पुढील तपासासाठी वाकड पोलिसांनी शिंदे याला फलटण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.