पिंपरीत कोरोना नियमांची पायमल्ली! विनामास्क फिरणाऱ्या २९८ जणांवर पोलिसांकडून कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:29 PM2021-05-06T16:29:54+5:302021-05-06T16:30:00+5:30
नागरिकांचे नियमांकडे दुर्लक्ष
पिंपरी: शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची विचारपूसही केली जात आहे. तरीही नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा विनामास्क फिरणाऱ्या २९८ जणांवर पिंपरी -चिंचवड पोलिसांनी बुधवारी कारवाई केली.
कोरोनावर मात करण्यासाठी मास्क हे शस्त्र असल्याचे तज्ञ सांगत आहेत. मास्कमुळे अजूनही लोक या आजारापासून सुरक्षित आहेत. पण काहींना याबाबतचे गांभीर्य नसल्याने ते मास्क घालत नाहीत. नंतर स्वतःसहीत संपूर्ण कुटुंबाचा जीव धोक्यात घालत आहेत. दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नियमांबाबत प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. म्हणूनच नागरिकांनी घरातच थांबून निर्बंध व नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यासाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून होत आहे. दरम्यान काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. तसेच काही वाहनचालक मास्कचा वापर करत नसल्याचे दिसून येते. अशीच वागणूक राहिल्यास नागरिकांना सामोरे जावे लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई
एमआयडीसी भोसरी (४८), भोसरी (०८), पिंपरी (०९), चिंचवड (२३), निगडी (०७), आळंदी (१७), चाकण (०७), दिघी (०६), सांगवी (१९), वाकड (१२), हिंजवडी (२९), देहूरोड (३२), तळेगाव दाभाडे (१६), चिखली (१७), रावेत चौकी (१३), शिरगाव चौकी (२४), म्हाळुंगे चौकी (११) या पोलीस ठाण्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.