पिंपरी : पोलिसांची लक्ष्मण रेषा बनली गुंडाची दहशत कक्षा, दहशतीमुळे रहिवासी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 05:11 AM2018-01-25T05:11:59+5:302018-01-25T05:12:15+5:30
देहूरोड (ग्रामीण) पोलिसांच्या हद्दीचे शेवटचे टोक, तर परिमंडळ तीन (पिंपरी-चिंचवड) पोलिसांची लक्ष्मण रेषा... त्यामुळे सर्व काही अलबेल आणि अर्थपूर्ण दुर्लक्षित असलेल्या प्राधिकरण सेक्टर क्रमांक २९ चा परिसर अवैध धंद्यांचे आगर बनले असून, येथील वाढत्या गुंडागर्दीमुळे सर्वसामान्य नागरिकांत प्रचंड दहशत आहे.
पिंपरी : देहूरोड (ग्रामीण) पोलिसांच्या हद्दीचे शेवटचे टोक, तर परिमंडळ तीन (पिंपरी-चिंचवड) पोलिसांची लक्ष्मण रेषा... त्यामुळे सर्व काही अलबेल आणि अर्थपूर्ण दुर्लक्षित असलेल्या प्राधिकरण सेक्टर क्रमांक २९ चा परिसर अवैध धंद्यांचे आगर बनले असून, येथील वाढत्या गुंडागर्दीमुळे सर्वसामान्य नागरिकांत प्रचंड दहशत आहे.
सेक्टर क्रमांक २९, रमाबाई आंबेडकरनगर, जाधव वस्ती, शिंदे वस्ती, आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या आसपासचा सर्व परिसरात बहुसंख्य महाविद्यालये असल्याने हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. मात्र याही गर्दीत व परिसरात वचक बसविण्यासाठी श्रेयवादामुळे गुंडांमध्ये कायम धुसफूस सुरू असते. यातूनच वारंवार भांडणे होऊन तलवारींंचा नाच होतो.
देहू पोलिसांचे दुर्लक्ष व काणाडोळा आणि छुप्या पाठिंब्याच्या जोरावर येथील गुंडागर्दी वाढत चालली आहे. २४ तास खुलेआम अवैध धंदे, अवैध धंदेवाल्यांची हप्ता वसुली, त्यातून सततची भांडणे, धिंगाणा, गोंधळ, खून, मारामारी अशा भानगडीमुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड दहशतीखाली असल्याचे वास्तव आहे. शिक्षणासाठी येथे विद्यार्थी वास्तव्यास आले आहेत. त्यांच्या सोयीसाठी अनेक हॉस्टेल, होटेल, मेस थाटली गेली. मात्र, रात्रभर हॉटेल व चायनीजच्या नावाखाली बिनबोभाट अनेक धंदे रात्रभर सुरू आहेत, यासह पूल टेबल, हुक्का पार्लर, मद्य, नशिले पदार्थ, पानटपरी, पत्ता क्लब या ठिकाणी २४ तासांत अगदी सहज मिळतात, तर येथील फोअर स्क्वेअर इमारतीच्या पार्किंगच्या जागेत ऐन रस्त्यावर आणि हाय टेन्शन खांबाच्या ताराखाली विनापरवाना हॉटेलचा पसारा मांडण्यात आला आहे. येथे पूल टेबल, रात्रभर सुरू असल्यामुळे येणाºया-जाणाºया महिलांना त्रास होतो.
येथील टोळीयुद्ध, धुडगूस आणि कायम सुरू असलेली हाणामारी, हुल्लडबाजी यामुळे नागरिकांना वावरणे कठीण झाले आहे. एकीकडे पोलीस सोयीस्कररीत्या डोळेझाक करून कारवाई करीत नाहीत, तर प्राधिकरणाच्या जागेत हॉटेलवर कारवाई होत नाही.
पोलीस स्टेशन लांब पल्ल्यावर
ग्रामीण भागाला आणि लांब पल्ल्याच्या ठिकाणी देहूरोड पोलीस स्टेशन असून, ते लांब असल्याने नागरिकांना मदत घेणे कठीण जाते, तर पोलीस केवळ वसुलीसाठीच येथे आठवड्यातून एक-दोन वेळा फिरकतात असा आरोप नागरिक करीत आहेत. महापालिका निवडणुकीत एका कंटेनरमध्ये तात्पुरती पोलीस चौकी उभारण्यात आली. मात्र तिला अद्याप टाळा आहे.
अपरात्री साजरे होतात वाढदिवस
रात्री-अपरात्री भर रस्त्यात केक कापून वाढदिवस साजरा केला जातो. मात्र सर्रासपणे केक तलवारीने कापणे हे फॅड या भागात अधिक आहे. तर केक कापून झाल्यानंतर रस्त्यावरच केक, अंडी, तेल इत्यादी टाकले जाते. या धांगड- धिंग्यामुळे महिला व विद्यार्थिनींना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. व्यापारी वर्गाकडून हप्ते घेतले जातात. दोन वर्षांपूर्वी गाड्यांच्या व बंगल्यांच्या काचा फोडण्याचे अनेक प्रकार घडले होते. पूल टेबल, तसेच रात्रीचे हॉटेल बंद करणे गरजेचे आहे.
लेखी तक्रारीकडे केले जाते दुर्लक्ष
पिंपरी-चिंचवड शहरात ग्रामीण आणि शहरी दोन्ही पोलिसांच्या हद्दीच्या शेवटी हे ठिकाण असल्याने येथे केवळ सर्व काही अलबेल असल्याचे भासविले जाते; मात्र वास्तव भयानक आहे अनेकदा लेखी तक्रार देऊनही पोलीस काहीच कारवाई करीत नसल्याचा आरोप होत आहे. दोन दिवसांपूर्वी येथे मोठा गोंधळ झाला. यानंतर पोलिसांचे वाहन येथे काही तास उभे होते.