पिंपरीचे महापौर बदलाच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:53 AM2018-06-19T01:53:09+5:302018-06-19T01:53:09+5:30
महापौर नितीन काळजे यांचा सव्वा वर्षांचा कालखंड पूर्ण झाला असल्याने महापौरपद बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पिंपरी : महापौर नितीन काळजे यांचा सव्वा वर्षांचा कालखंड पूर्ण झाला असल्याने महापौरपद बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भोसरी, चिंचवड आणि पिंपरी अशा तीनही मतदारसंघांतून इच्छुकांची संख्या अधिक आहे. भोसरीतील संतोष लोंढे यांनी या पदावर दावा केल्याने महापौर बदलाच्या हालचालींना वेग आला आहे.
महापालिकेत सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर होण्याचा मान आमदार महेश लांडगेसमर्थक व चºहोलीचे नगरसेवक नितीन काळजे यांना मिळाला. महापौरपद हे इतर मागासवर्गीय गटास आरक्षित आहे. हे पद सव्वा-सव्वा वर्षे विभागून देण्याचे धोरण भाजपाने स्वीकारले आहे.
गेल्या वर्षी काळजे यांना महापौरपद, तर आमदार लक्ष्मण जगतापसमर्थक सीमा सावळे यांना स्थायी समिती अध्यक्षपद, जुन्या कार्यकर्त्यांपैकी एकनाथ पवार यांना सत्तारूढ पक्षनेतेपद आणि पिंपरी विधानसभेतील शैलजा मोरे यांना उपमहापौरपद दिले होते. काही दिवसांपूर्वी महापौर बदलणार का, असा प्रश्न शहराध्यक्षांना विचारल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या सूचना आल्यानंतर निर्णय घेऊ, असे उत्तर त्यांनी दिले होते. या पदावर सव्वा-सव्वा वर्षे संधी दिली जाणार आहे.
।भाजपा निष्ठावंतांचा दावा
स्थायी समिती सभापतिपद दुसऱ्यांदा चिंचवड समर्थकांना दिले गेले आहे. त्यामुळे महापौरपद पिंपरीला की भोसरीला मिळणार, याबाबत चर्चा रंगली आहे. स्थायी समितीत अन्याय झाल्याने भोसरीला महापौरपद मिळेल, अशीही चर्चा आहे. स्थायी समिती सभापतिपदी डावललेल्या लांडगे गटाच्या राहुल जाधव, संतोष लोंढे; तसेच चिंचवडमधून ज्येष्ठ कायकर्ते नामदेव ढाके, शीतल शिंदे, शस्त्रुघ्न काटे यांच्या नावाची चर्चा आहे. महापौरपदासाठी लोंढे यांनी ओबीसीच्या विविध संघटनांचा त्यांना पाठिंबा असल्याचा दावा पत्रकार परिषद घेऊन केला.