पिंपरी मेट्रोचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 01:31 AM2019-01-06T01:31:22+5:302019-01-06T01:32:00+5:30
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप, भाजपाचे पदाधिकारी ठेकेदारांच्या पाठीशी
पिंपरी : मेट्रोचे काम सुरू असताना ड्रिलिंग मशिन कोसळून नाशिक फाटा येथे शनिवारी अपघाताची घटना घडली. जीवित वा वित्तहानी झाली नसली, तरी अपघाताची घटना गंभीर होती. दुपारी वर्दळ कमी व पोलिसांनी एक लेन बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली. परंतु, महामेट्रोकडून कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा, दक्षता व कामाच्या दर्जाविषयी योग्य दखल घेतली जात नसल्याचा भोंगळ कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. त्यामध्ये दापोडी ते पिंपरी या मार्गावर मेट्रोसाठी पिलर उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सहा महिन्यांपूर्वीच खराळवाडी भागात निकृष्ट दर्जाचे पिलर उभारण्यात आल्याचा प्रकार महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी उजेडात आणला होता. त्यानंतर महामेट्रो प्रशासनाने निकृष्ट दर्जाचे पिलर काढून टाकले, तसेच ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली होती. मेट्रोचे काम सुरू असताना अपघात होऊन सुरक्षा रक्षक जखमी होण्याची घटनाही घडली आहे.
दरम्यान, शहराच्या हद्दीत मेट्रोचे काम सुरू असलेतरी महापालिका प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण या कामांवर नाही. त्यामुळे मेट्रोला पाहिजे, त्या पद्धतीने कामे सुरू आहेत. सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी मेट्रोच्या कामांची तपासणी व नियंत्रण ठेवण्याऐवजी चुकीच्या कामांना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
ड्रिलिंग मशिन कोसळण्यापूर्वी काही सेकंदच या ठिकाणाहून पीएमपीची प्रवासी वाहतूक बस निघून गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये कैद झाले आहे. त्यामुळे बस दुर्घटना टळली असल्याचा दावा या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी केला आहे.
कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई अन् महामेट्रोची दिलगिरी
पिंपरी : नाशिक फाटा येथे महामेट्रोच्या कामादरम्यान जमीन भुसभुशीत असल्यामुळे १२० टन वजनाची पायलिंग रिंग मशिन कोसळली. दरम्यान, या घटनेबाबत संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करून पुढील कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. पायलिंग रिंगचे वजन हे १२० टन असल्यामुळे साध्या हायड्रा क्रेनने उचलणे शक्य नव्हते. त्यामुळे मेट्रो प्रशासनाला मेट्रोच्या दुसºया ठिकाणची २०० टन वजन असलेली क्रेन आणावी लागली.
४त्यानंतर या क्रेनच्या साहाय्याने पायलिंग रिंग मशिन उभी करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पायलिंग रिंग मशिनचा चालक प्रशिक्षित होता व महामेट्रोच्या ठिकाणी सहा महिन्यांपासून कार्यरत होता. दरम्यान, शनिवारी नाशिक फाटा येथे काम करीत असताना मशिनचे वजन अधिक असल्यामुळे व जमिनीचा समतोल बिघडला. तसेच जमीन भुसभुशीत झाल्याने चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे ही घटना घडल्याचेही महामेट्रोने स्पष्ट करून दिलगिरी व्यक्त केली आहे.
नाशिक फाटा येथे दुर्घटना घडल्याचे कळाल्यानंतर तातडीने माहिती घेतली. परंतु, कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. महापालिकेत नागरिक माझ्याकडे कामासाठी आले होते. त्यामुळे तातडीने घटनास्थळी जाता आले नाही. मात्र, सायंकाळी या ठिकाणी पाहणी करून मेट्रोच्या प्रशासनाला सुरक्षा व्यवस्थेविषयी सूचना करणार आहे.
- राहुल जाधव, महापौर
महामेट्रोकडून पिंपरी भागात काम सुरू आहे. शनिवारी ड्रिलिंग मशिन कोसळली. परंतु, कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. मेट्रोच्या कामाचे स्वरूप मोठे असल्याने छोट्या घटना घडू शकतात. परंतु, यापुढील काळात मेट्रोचे काम करताना सुरक्षिततेकडे लक्ष देण्याविषयीच्या सूचना करण्यात येणार आहेत.
- एकनाथ पवार,
सत्तारूढ पक्षनेते
नाशिक फाटा येथे शनिवारी दुपारी दुर्घटना घडली. तरीही भाजपाचे नगरसेवक विलास मडिगेरीवगळता एकही पदाधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे हे दोघेही या ठिकाणी आले नाहीत. यावरून मेट्रोच्या कामामध्ये दोन्ही आमदारांचे बगलबच्चे ठेकेदार म्हणून काम करीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, यापुढे मेट्रो प्रशासनाला पुरेशी सुरक्षा व्यवस्था उभारल्याशिवाय काम करू देणार नाही.
- दत्ता साने, विरोधी पक्षनेता
जमीन भुसभुशीत असल्याने खोदाई करणाºया रीग मशिनची चाके जमिनीत रुतली. रीग मशिन हळूहळू कोसळले. दुपारी वाहनांची वर्दळ कमी असते; त्यामुळे दुपारी दोन तास अवजड कामे करण्यास परवानगी दिली जाते. या दरम्यान एक लेन बंद असते. ही दक्षता घेतली असल्याने या दुर्घटनेत कोणालाही काही इजा झाली नाही वा वाहनांचे नुकसान झाले नाही. घटना घडताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वाहतूककोंडीही वेळीच सोडविण्यात आली.
- नीलिमा जाधव, सहायक पोलीस
आयुक्त, भोसरी विभाग
कासारवाडीजवळ नाशिक फाटा येथे मेट्रोच्या पिलर उभारणीचे काम सुरू असताना, रीग मशिन आणि पोकलेन कोसळले. जमीन भुसभुशीत असल्याने हा अपघात घडला. रीग मशिन वेगात कोसळले नाही. रीग मशिनची चाके जमिनीत जसजशी रुतत गेली तसतसे हळूहळू रीग मशिन खाली कोसळले. रीग मशिनला आधार देणारे पोकलेनही पलटी झाले. नेमके काय चुकले, ज्यामुळे अपघात झाला, याची मेट्रो व्यवस्थापनातर्फे चौकशी होईल. दोषी आढळणाºयावर कारवाई केली जाईल.
- किशोर करांडे, व्यवस्थापक,
सुरक्षा व वाहतूक (मेट्रो प्रकल्प)