अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये तब्बल ५० वेळा सभा तहकूब : पिंपरी महापालिकेचा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 08:24 PM2019-09-03T20:24:20+5:302019-09-03T20:33:09+5:30
मागील अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये तब्बल ५० वेळा सभा तहकूब करण्याचा विक्रम महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी केला आहे.
पिंपरी : मान्यवरांना श्रद्धांजली वाहून पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवार (दि. ७) पर्यंत तहकूब करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर सचिन चिंचवडे होते. मागील अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये तब्बल ५० वेळा सभा तहकूब करण्याचा विक्रम महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी केला आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्याची तहकूब सभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरूवातीलाच भाजपचे नगरसेवक नामदेव ढाके यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची सूचना मांडली. त्यानंतर नगरसेवक केशव घोळवे, सुलक्षणा दर, दत्ता साने, आशा शेडगे यांनीही श्रद्धांजलीपर भाषणे केली. येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून तहकूब होत असलेले महासभेचे कामकाज भाजप पदाधिकारी पूर्ण करतील अशी आशा शहरवासियांना होती. मात्र सभेच्या कामकाजाबाबत भाजप नगरसेवकांमध्ये उदासिनता असल्याचे चित्र आहे. मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर काही मिनिटे महासभा तहकूब करून पुन्हा कामकाज सुरू होणे आवश्यक आहे. मात्र सभेचे कामकाज वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे.
जुलै महिन्यांची महासभा सप्टेंबर उजाडला तरीही पूर्ण होऊ शकली नाही. विविध कारणांनी जुलै महिन्याची महासभा सलग सहा वेळा तहकूब करण्यात आली आहे. तर, ऑगस्ट महिन्याची सभाही तहकूब करण्यात आली आहे. या दोनही सभा शनिवारी आयोजित करण्यात आल्या आहेत.
.......................
उपमहापौरांवर अभिनंदनाचा वर्षाव
महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांचे एक महिन्याचे आणि अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे मानधन पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. त्याचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यासाठी महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार आणि आयुक्त श्रावण हर्डीकर मुंबईला गेले आहेत. त्यामुळे महासभेच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर सचिन चिंचवडे यांना महासभेचे अध्यक्षस्थान भूषविण्याची संधी मिळाली. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपमहापौरांचे अभिनंदन केले.
माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, उपमहापौर चिंचवडे यांच्या हाती सभेची सूत्रे आहेत. त्यांनी सभा कामकाज चालवावे. त्यांच्याकडे रिमोट कंट्रोल आहे. त्यांनी त्यांचे काम दाखवून द्यावे. विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, उपमहापौर आमदारकीची तयारी करत असताना त्यांना महापौर म्हणून बसायला मिळाले त्यामुळे त्यांचे आभिनंदन करतो.