पिंपरी महापालिकेची मिळकत सवलत योजना फसवी, शिवसेनेचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:04 PM2018-05-23T22:04:51+5:302018-05-23T22:04:51+5:30
मे महिना संपत आला तरी बिलांची छपाई अद्याप झाली नाही.त्यामुळे प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे मिळकतधारक सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकतकर विभागाने जूनअखेर कर भरणाऱ्या नागरिकांना सामान्यकरात दहा टक्के सवलत जाहीर केली आहे. ही योजना फसवी असल्याची टीका शिवसेनेने स्थायी समितीत केली. मिळकतधारकांना बिलेच दिली नाहीत मग सवलत कशी मिळेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.. त्यावेळी छपाईचे काम अंतिम टप्प्यात असून जूनच्या पहिल्या आठवड्यात बिलाचे वाटप करणार असल्याचे उत्तर महापलिका प्रशासनाने दिले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आगामी वर्षाचा मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना सवलत योजना जाहीर केली आहे. सवलत योजना, वसुली जनजागृतीसाठी महापालिकेच्या करसंकलन विभागाने एफएम रेडिओ या माध्यमाचा वापर करण्याचे ठरविले आहे. जून महिन्यात कर सवलतींची माहिती मिळकतधारकांना देण्यात येणार आहे. यासाठी नऊ लाख ३४ हजार खर्च येणार आहे. याविषयीचा विषय स्थायी समितीसमोर चर्चेला आला असताना शिवसेनेचे अमित गावडे यांनी प्रशासनास धारेवर धरले.
गावडे म्हणाले, महापालिकेने मिळकतधारकांसाठी सवलत योजना जाहीर केली आहे. थकबाकीसह दोन्ही सहामाही बिलांची रक्कम ३० जूनपर्यंत एकरकमी भरल्यास सामान्यकरात सवलत मिळणार आहे. मात्र, मे महिना संपत आला तरी बिलांची छपाई अद्याप झाली नाही. बिलांची छपाई कधी वाटप कधी होणार त्यामुळे मिळकतकर विभाग प्रशासनाच्या दिरंगाईमुळे मिळकत भरणाऱ्या धारकांना सवलतीचा लाभ मिळणार नाही. प्रशासनाने यापूर्वीच बिलांची छपाई करून मिळकतधारकांना वाटणे गरजेचे होते. प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे मिळकतधारक सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियोजनशून्य प्रशासनामुळे पालिकेच्या तिजोरीतदेखील कराचे पैसे जमा होत नाही. प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे नागरिकांना या सवलतीचा लाभ घेता येत नाही. ही योजना फसवी ठरली आहे.
करसंकलन विभागाच्या प्रशासन अधिकारी रेखा गाडेकर म्हणाल्या, मिळकतकर बिलासंदर्भात सभेत चर्चा झाली. त्यावेळी मिळकतकर बिलांची छपाई अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. छपाईनंतर जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शहरात बिलांचे वाटप करण्यात येईल.