पिंपरीच्या महापालिका शाळेतील शिक्षिकेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 05:39 PM2021-10-10T17:39:00+5:302021-10-10T17:44:23+5:30
पिंपळे सौदागर येथे हाउसिंग सोसायटीतील नळाच्या पाण्यावरून वाद झाला. यात एका महिलेसह महापालिका शाळेतील शिक्षिकेचा विनयभंग झाला.
पिंपरी : हाउसिंग सोसायटीतील नळाच्या पाण्यावरून वाद झाला. यात एका महिलेसह महापालिका शाळेतील शिक्षिकेचा विनयभंग झाला. पिंपळे सौदागर येथे गुरुवारी ही घटना घडली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल केला.
पहिल्या प्रकरणात पीडित महिलेने शुक्रवारी (दि. ८) फिर्याद दिली. त्यानुसार ४० वर्षीय महिला व तिचा पती यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय महिला व तिचा पती हे दोघेही महापालिका शाळेत शिक्षक आहेत. फिर्यादी व शिक्षक दाम्पत्य एकाच सोसायटीत राहतात. फिर्यादी महिला सोसायटीतील महिलांशी पाण्याविषयी चर्चा करीत असताना शिक्षक दाम्पत्य तेथे आले. तुम्ही कॉमन नळाला पाईप जोडल्याने आम्हाला पाणी येत नाही, असे फिर्यादी म्हणाल्या. त्यावरून शिक्षकाने त्यांच्याशी वाद घातला. तुम्ही मला बोलण्याचा संबंध नाही. तू कोण आहेस तुला मी ओळखत नाही, असे फिर्यादी म्हणाल्या. तू माझ्या नवऱ्याला आरे तुरे का म्हणतेस, असे म्हणून शिक्षिकेने फिर्यादीला मारहाण केली. मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून शिक्षकाने फिर्यादीचा विनयभंग केला. तुम्ही दोघे शिक्षक आहात, तुम्हाला असे शोभते का, असे फिर्यादीची मुले म्हणाली. त्यावरून शिक्षक दाम्पत्याने फिर्यादीच्या दोन्ही मुलांना मारहाण केली.
दुसऱ्या प्रकरणात महापािलका शाळेतील ४० वर्षीय शिक्षिकेने शनिवारी (दि. ९) फिर्याद दिली. ५० वर्षीय महिलेसह तिच्या दोन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. फिर्यादी शिक्षिका व त्यांचे शिक्षक पती हे खरेदी करून घरी येत असताना ५० वर्षीय महिलेने फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ केली. तुमच्यामुळे सोसायटीमध्ये पाण्याचा प्राॅब्लेम होत आहे, असे महिला म्हणाली. महिलेच्या मुलांनी फिर्यादीचा विनयभंग केला. त्यानंतर फिर्यादी घरी गेल्या. तुम्ही बाहेर या, माझी पण पालिकेत ओळख आहे. तुम्ही कशा नोकऱ्या करता तेच मी बघतो, असे म्हणून ५० वर्षीय महिलेच्या मुलाने धमकी दिली.