गावठी पिस्तूल विक्रीचा पिंपरी पॅटर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 02:31 AM2018-12-03T02:31:41+5:302018-12-03T02:31:51+5:30
जमीन खरेदी-विक्री व्यवहारापासून ते औद्योगिक क्षेत्रात कंत्राट मिळविणे, अवैध धंद्यामध्ये शिरकाव अशा पद्धतीने सर्वत्र माफियांचा सुळसुळाट झाला आहे.
- संजय माने
पिंपरी : जमीन खरेदी-विक्री व्यवहारापासून ते औद्योगिक क्षेत्रात कंत्राट मिळविणे, अवैध धंद्यामध्ये शिरकाव अशा पद्धतीने सर्वत्र माफियांचा सुळसुळाट झाला आहे. वर्चस्ववादातून स्थानिक गुंडांच्या टोळ्यांमध्ये वारंवार धुमश्चक्री होत असून, शहरातील गुन्हेगारीचे थेट परप्रांतीयांमध्ये कनेक्शन जोडले गेले आहे. परराज्यांतून येणारे पिस्तूल खुलेआम शहरात विक्री होत असून, पिस्तूल खरेदी-विक्रीच्या बाजारपेठेचा पिंपरी-चिंचवड पॅटर्न सर्वत्र चर्चेत आला आहे. शहरात आठवड्याला किमान पिस्तूल जप्तीच्या दोन घटना असून, महिन्याभरात सुमारे १८ पिस्तूल व ९६ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात रोजच कोठे ना कोठे बेकायदा पिस्तूल बाळगणारे आढळून येऊ लागले आहेत. पिस्तूल आणि काडतुसे दोन ते तीन दिवसांतून पोलिसांकडून जप्त केली जात आहेत. निगडी, पिंपळे गुरव, सांगवी, भोसरी, दिघी, पिंपरी, वाकड, हिंजवडी आणि भोसरी, चाकण परिसरातही पिस्तूल विक्रीचे रॅकेट सक्रिय असल्याचे विविध घटनांतून निदर्शनास आले आहे. स्थानिक गुंडांनी उत्तर प्रदेशमधील अवैध धंदे, गुन्हेगारी जगताशी संबंध प्रस्थापित केले आहेत.
गुन्हेगारी कारवायांमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर करून घेतला जात असून, अगदी मिसरूड न फुटलेल्या मुलांकडेही सहज पिस्तूल मिळून येऊ लागली आहेत. शहराच्या विविध भागात स्थानिक भाई, दादांच्या टोळ्या कार्यरत आहेत. गुन्हेगारीच्या उंबरठ्यावर असलेले तरुणांचे ग्रुप अशा पद्धतीने पिस्तूल मिळवत आहेत. पिस्तूल विक्री करणारा रोज किमान एक तरी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला, तरी पिस्तूलविक्रीच्या बाजारपेठेवर त्याचा प्रतिकूल परिणाम जाणवत नाही.
अभियंत्याकडे सापडली १५ काडतुसे
निगडी येथील ओटा स्कीम भागातील रहिवासी असलेला अनुप नवनाथ सोनवणे (वय २८) हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला तरुण गुन्हेगारीकडे वळला असून, तो चक्क पिस्तूल विक्रीच्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचा साथीदार अवधूत जालिंदर गाढवे हा हॉटेल व्यावसायिक असून, गुन्हेगारी कृत्यांत आघाडीवर आहे.
या दोघांकडे विक्रीसाठी आणलेली देशी बनावटीची सात पिस्तुले आणि १५ काडतुसे आढळून आली. १ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केला. आॅगस्टमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन लेबर सप्लायचा व्यवसाय करणारा अनुप सोनवणे हा तरुण गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय झाला आहे. त्याच्यावर विनयभंग आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोंगरकिनी गावचा आहे. त्याच्या निगडी येथील घराची झडती घेतली असता, चार पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे पोलिसांना आढळून आली होती. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने मोशी येथील अवधूत जालिंधर गाढवे यास पिस्तूलविक्री केल्याची कबुली दिली होती.
अवधूत यास आळंदी परिसरातून ताब्यात घेतले असता, त्याने अनुपकडून दोन पिस्तूल खरेदी केल्याची कबुली दिली होती. आळंदी केळगावजवळ पिस्तुलाची चाचणीही घेतली असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले होते.
>परराज्यांतून होतेय
पिस्तुलांची आवक
शहरात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने परराज्यांतून बेकायदापणे पिस्तुलांची आवक होत आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने आरोपी दौंडकर यास मागील मंगळवारी बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. गावठी बनावटीच्या पिस्तूल, तसेच ११ जिवंत काडतुसे आणि दुचाकी यासह त्याला अटक केली होती. पोलिसांनी त्याचे रिमांड घेऊन चौकशी केली असता, खेड तालुक्यातील चांदुस कोरेगाव या ठिकाणी फार्म हाऊसवर आणखी पिस्तूल ठेवले असल्याची माहिती त्याने दिली. तपास पथकाने फार्म हाऊसवर जाऊन आरोपीने लपवून ठेवलेले ५ देशी बनावटीचे पिस्तूल आणि १७ जिवंत काडतुसे हस्तगत केली. लोहमार्गालगत कचरावेचक महिलेला एका पिशवीत तब्बल ४३ जिवंत काडतुसे सापडली. २५ नोव्हेंबरला देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या भोसरीतील अमोल सूर्यभान लवंडे या तरुणाला पिस्तूल, दोन जिवंत काडतुसांसह पोलिसांनी अटक केली होती.
>तरुणाईचे हत्यारासह
छबीचे स्टेटस
तरुणाई गुन्हेगारीच्या उंबरठ्यावर असून, तरुणांचे ग्रुप तयार झाले आहेत. स्थानिक दादा, भार्इंना आपले आदर्श मानणारे तरुण सोशल मीडियावर शस्त्र हातात घेतलेली छबी झळकावू लागले आहेत. हातात पिस्तूल, तलवार घेतलेले ग्रुप फोटो फेसबुक, व्हॉटस अॅपवर स्टेटस सिम्बॉल म्हणून वापरात आणले जात आहेत. याबद्दल पालक वर्गात चिंता व्यक्त होत असली, तरी तरुणाईला गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी
वेळीच उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.