निघोजे येथे हातभट्टीवर पिंपरी पोलिसांचा छापा; आठ लाखांचे साहित्य जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 04:47 PM2020-11-07T16:47:14+5:302020-11-07T16:48:15+5:30
इंद्रायणी नदीकाठी आरोपी गावठी दारू तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पिंपरी : गावठी हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी दारु, कच्चे रसायन, चारचाकी वाहन, मोबाइल, असा एकूण आठ लाख १३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.
फकिर हसन पटेल (वय ३६, पद्मावती झोपडपट्टी, कात्रज), दीपक मधुकर करे (वय २३, रा. निराधार नगर, पिंपरी, सध्या रा. शांती काॅलनी, काळेवाडी), नागेश जगन्नाथ सूर्यवंशी (वय २४, रा. निराधारनगर, पिंपरी), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. निघोजे गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीकाठी
आरोपी दारुची भट्टी लावून गावठी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार हातभट्टीवर छापा टाकला. त्यावेळी आरोपी दारू तयार करून वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडून आठ हजारांची रोकड, ७४ हजार ७५० रुपयांची हातभट्टीची दारू, दारूचे चार लाख ५० हजारांचे कच्चे रसायन, दोन लाख ७० हजार रुपयांची वाहने, तसेच १० हजार ८०० रुपयांचे मोबाइल असा एकूण आठ लाख १३ हजार ५५० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.
सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, सहायक फाैजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी सुनील शिरसाट, अनिल महाजन, भगवंता मुठे, नितीन लोंढे, अमोल
शिंदे, वैष्णवी गावडे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, योगेश तिडके, राजेश कोकाटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.