पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून भूमिपूजन

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: March 6, 2024 11:45 AM2024-03-06T11:45:46+5:302024-03-06T11:45:54+5:30

उद्घाटन झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून हे काम ३९ महिन्यांमध्ये पूर्ण होणार

Pimpri to Nigdi metro line work started Bhumi Pujan by Prime Minister Narendra Modi | पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून भूमिपूजन

पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून भूमिपूजन

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कोलकाता येथून पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाइन माध्यमातून हे भूमिपूजन केले. पीसीएमसी मेट्रोस्थानकावर हा भूमिपूजन समारंभ बुधवारी झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे भूमिपूजन झाले. एस्प्लानेड मेट्रो स्टेशन कोलकाता येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी या मार्गीकेवरील दापोडीतील हॅरिस ब्रिजपासूनचा मेट्रो मार्ग पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत येतो. मेट्रो पिंपरी पर्यंत आली मात्र ती निगडी पर्यंत सुरु होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार महामेट्रो कडून या विस्तारित मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. त्याला राज्य शासनाची परवानगी मिळाली आणि हा अहवाल केंद्राकडे गेला. पिंपरी ते निगडी या विस्तारीकरणाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने २३ ऑक्टोबर २०२३ ला मान्यता दिली.

काम पुर्ण होण्यास लागणार तीन वर्षे....

पिंपरी स्थानकाजवळील एम्पायर इस्टेट पुलापर्यंत मेट्रो मार्गाचे काम झाले आहे. सध्या तिथे मेट्रो यार्ड आहे. तेथून पुढे मार्ग विस्तारीकरणाचे नियोजन आहे. पिंपरी ते निगडी दरम्यान ४.४ किलोमीटर अंतरावर चिंचवड स्टेशन (महावीर चौक व अहिंसा चौक दरम्यान), आकुर्डीतील खंडोबा माळ चौक, निगडी (टिळक चौक व भक्ती-शक्ती चौक दरम्यान) अशी तीन स्थानके असणार आहेत. या कामासाठी ९१० कोटी १८ लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. बुधवारी उद्घाटन झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. हे काम ३९ महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे.

Web Title: Pimpri to Nigdi metro line work started Bhumi Pujan by Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.