पिंपरीत वाहनचोरीचे सत्र सुरूच, तीन दुचाकी, एका कार चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 03:42 PM2021-07-19T15:42:59+5:302021-07-19T15:43:06+5:30
शहरात रविवारी वाहनचोरीच्या चार घटना उघडकीस आल्या आहेत. भोसरी, वाकड परिसरातून भरदिवसा दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत.
पिंपरी: शहरात वाहनचोरीचे सत्रच आहे. शहरात रविवारी वाहनचोरीच्या चार घटना उघडकीस आल्या आहेत. भोसरी, वाकड परिसरातून भरदिवसा दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. तर हिंजवडीमधून एक दुचाकी आणि तळेगाव-दाभाडे परिसरातून एक मोटार चोरीला गेली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
भोसरी पोलीस ठाण्यात वरुण नीलेश सुडोकार (वय २०, रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सुडोकार यांनी त्यांची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी २४ मेला सकाळी आठ वाजता लांडेवाडी येथील अॅम्फेनॉल कंपनीसमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सायंकाळी साडेआठ वाजता उघडकीस आला.
खेमिया हनुमंता मेघावत (वय ३२, रा. पाषाण) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मेघावत यांनी त्यांची १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी शनिवारी सकाळी नऊ वाजता वाघमारे चौकातील सिल्वर जीम येथे पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सायंकाळी सहा वाजता उघडकीस आला.
सद्दाम लियाकत अली अन्सारी हुसेन (वय २७, रा. माण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हुसेन यांनी त्यांची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी सहा जुलैला रात्री अकरा वाजता पेट्रोल संपल्यामुळे राक्षेवस्ती येथील एका हॉटेलसमोर पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. सात जुलैला सकाळी साडेसहा वाजता हा प्रकार उघडकीस आला.
रमेश घिसाराम चौधरी (वय ३४, रा. तळेगाव स्टेशन) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची दोन लाख रुपये किंमतीची मोटार रविवारी रात्री नऊ वाजता त्यांच्या सोसायटीच्या बाहेरील पार्किंगमध्ये पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची मोटार चोरून नेली. हा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला.