पिंपरी : सत्ताधा-यांनी लादली पाणीपट्टी दरवाढ, विरोधकांचा सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 07:05 AM2018-03-01T07:05:04+5:302018-03-01T07:05:04+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने विरोधकांचे मत विचारात न घेताच सर्वसाधारण सभेत पाणीपट्टी दरवाढ बहुमताच्या जोरावर लादली असून, सभागृहात बोलू न दिल्याने ‘महापौर आणि भाजपाचा धिक्कार असो...’, ‘पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे.....

Pimpri: Waterloo loads imposed by powerhouse, closure of opponents | पिंपरी : सत्ताधा-यांनी लादली पाणीपट्टी दरवाढ, विरोधकांचा सभात्याग

पिंपरी : सत्ताधा-यांनी लादली पाणीपट्टी दरवाढ, विरोधकांचा सभात्याग

googlenewsNext

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने विरोधकांचे मत विचारात न घेताच सर्वसाधारण सभेत पाणीपट्टी दरवाढ बहुमताच्या जोरावर लादली असून, सभागृहात बोलू न दिल्याने ‘महापौर आणि भाजपाचा धिक्कार असो...’, ‘पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे...’ अशी घोषणाबाजी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी केली. महापौरांच्या व्यासपीठासमोर गोंधळ घातला. तरीही बोलून न दिल्याने पाणीपट्टी दरवाढीचे विषयपत्रक फाडत सभात्याग केला.
स्थायी समितीने प्रशासनाने सुचविलेली दरवाढीस मान्यता देत सर्वसाधारण सभेपुढे विषय मंजुरीसाठी ठेवला होता. महापौर नितीन काळजे हे बुधवारी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. तुघलकी पाणीपुरवठा दरवाढीला सत्ताधाºयांचे प्रोत्साहन असल्याने निर्णयाविषयी उत्सुकता होती. पाणीपुरवठा दरवाढीचा विषय चर्चेला आल्यानंतर स्थायीने सुचविलेल्या दरवाढीला विलास मडिगेरी यांनी उपसूचना दिली. त्यानंतर या विषयावर चर्चा सुरू झाली. विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, ‘‘एकवेळही पाणी मिळत नाही. मग दरवाढ कशासाठी? दर वाढवायला हवेत, पण किती? आठवड्यातील तीन दिवसही पाणी पुरेशा दाबाने होत नाही मग वाढ कशासाठी? समान पाणी आणि पुरेसे पाणी दिले जात नाही तोपर्यंत दरवाढ करू नये.’’
दापोडी परिसरात ११ फेब्रुवारीपासून पाणी नाही, दरवाढ कशासाठी करता, असे राजू बनसोडे म्हणाले. त्यानंतर पाणीपट्टी दरवाढ ही अन्यायकारक आहे, ती रद्द करावी, अशी मागणी अ‍ॅड. सचिन भोसले यांनी केली. ‘आम्हाला २४ तास पाणी नको, एकदाच पुरेशा दाबाने आणि पुरेसा वेळ द्या, मगच दरवाढ करा. पाण्यावरून नागरिक आम्हाला हसू लागले आहेत, असे जावेद शेख यांनी सांगितले. श्रीमंत महापालिकेत पाणीवाढ करणे अयोग्य आहे,
कर लादल्यामुळे नागरिकांवर
भार पडणार असल्याचे मीनल यादव यांनी सांगितले.
पाणीदरवाढ करू नका, अशी भूमिका नाना काटे यांनी मांडली. पाण्याची समस्या झामा बारणे यांनी मांडली. नीता पाडळे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाचा पोलखोल केला. भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘पाणीपट्टी दरवाढ करताना प्रशासनाने गटनेत्यांची बैैठक घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांना विश्वासात न घेता दरवाढ केली आहे. पाणी गळतीकडे दुर्लक्ष होत आहे. पाणीचोरीही होत आहे. त्याचा भुर्दंड नागरिकांना का? प्रशासनाने किती पाणी चोरी रोखली. किती नळजोड अनधिकृत आहेत, याची माहिती द्यावी. पाणीचोरांची शिक्षा नागरिकांना कशासाठी? ’’
भाजपात दुही
पाणीपट्टी दरवाढीचा विषय ज्या सदस्यांना समजला त्यांनी विरोध केला, तर नेत्यांच्या इशाºयावर नाचणाºयांनी पाणीपट्टी दरवाढ किती आवश्यक आहे, असे गोडवे गायले. विषयाचा अभ्यास नसल्याचे दिसून आले. भाजपाचे नगरसेवक संदीप कस्पटे आणि तुषार कामठे
यांनीही पाणी दरवाढीस विरोध दर्शविला. प्रियंका बारसे, राजेंद्र लांडगे, सारिका लांडगे, स्वीनल म्हेत्रे, सुवर्णा बुर्डे यांनी प्रशासनाच्या बाजूने भूमिका मांडली. कारभारात सुधारणा करण्याची सूचना केली.
महापालिकेत सभा तहकुबीनंतरही गोंधळ; भाजपाविरोधात घोषणाबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महापालिकेची तहकूब सर्वसाधारण सभा सायंकाळी पुन्हा सुरू झाली. पाणी दरवाढीचा विषय मंजूर केला आहे. तुम्हाला चर्चा करायची असेल, तर करू शकता. त्यामुळे विरोधक संतप्त झाले. जोरदार घोषणाबाजी झाली. विरोधकांनी सत्ताधाºयांचा निषेध केला.
‘पाणीदरवाढ रद्द झालीच पाहिजे. भाजपाचे करायचे काय? खाली डोकं वर पाय..,’ ‘दरवाढ रद्द करा, नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. त्याचबरोबरच सत्ताधाºयांनीही ‘भाजपाचा विजय असो’ असे सांगून दरवाढीचे समर्थन केले. गोंधळ वाढल्याने महापौरांचा संयम सुटला. ‘पाणीपट्टी दरवाढीचा विषय मंजूर केली आहे. तुम्ही कोण सांगणार? तो आमचा अधिकार आहे. व्यासपीठापासून दूर व्हा अन्यथा कारवाई करावी लागेल,’ असे महापौरांनी सुनावले. तरीही गोंधळ सुरूच होता. त्या वेळी स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी ‘महापौर कडक कारवाई करा, व्यासपीठापासून सदस्य हटत नसतील, तर निलंबित करा,’ अशी मागणी केली. त्यानंतर महापौरांनी पुढील विषय मंजूर करण्यास
सुरुवात केली. राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाºयांनी घोषणाबाजी करीत सभात्याग केला.

Web Title: Pimpri: Waterloo loads imposed by powerhouse, closure of opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.