पिंपरीची मान शरमेने खाली झुकली; जेव्हा गुन्हेगाराने शिवीगाळ करत पोलिसांची कॉलर पकडली!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 06:12 PM2020-11-04T18:12:49+5:302020-11-04T18:19:30+5:30
'आयर्न मॅन' व गुन्हेगारांचे 'कर्दनकाळ' अशी ओळख असलेले कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आयुक्त म्हणून कारभार स्वीकारल्यानंतर देखील शहरातील गुन्हेगारी वाढतच चालली आहे चालला आहे.
पिंपरी : 'आयर्न मॅन' व गुन्हेगारांचे 'कर्दनकाळ' अशी ओळख असलेले कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त म्हणून कारभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी गुन्हेगारांना लक्ष्य करत कायद्यात राहण्याचा सल्ला दिला होता. परंतू, त्यानंतर देखील शहरातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच चालला आहे. तलवारी, कोयते नाचवत वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचे प्रकार शहरात सुरूच आहे. अशातच सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलिसांना दमदाटी आणि शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पिंपळे सौदागर येथे पोलिसांकडून विनामास्क आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी मास्क न घातल्यामुळे अडवले. मात्र, या तरुणांनी पोलिसांच्या अंगावर धावून जात तुझ्या अंगावर वर्दी आहे म्हणून नाहीतर इथेच काय ते दाखवले असते असे म्हणत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. याप्रकरणी दोघा आरोपींना सांगवी पोलिसांनी अटक केली.
अभिषेक राजू टेंकल (वय १८, रा. विष्णूकृपा वसाहत, शिवाजीनगर, पुणे), हरीष गणेश कांबळे (वय १८, साईबाबा मंदिराजवळ, शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ) अशी आरोपींची नावे आहे. कांबळे याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे.
पिंपळे सौदागर येथील पीएनजी ज्वेलर्ससमोर पोलीस तीन नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास विनामास्क आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करीत होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच, तुझे नाव सांग असे विचारत पोलिसाच्या छातीवर असलेल्या नावाच्या बिल्ल्याला हात लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.