तीन सराईत गुन्हेगारांकडून एक पिस्तूल, एक जिवंत काडतुसे व दोन कोयते जप्त; गुंडा विरोधी पथकाची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 08:12 PM2021-08-03T20:12:06+5:302021-08-03T20:12:21+5:30
तीन जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी : सराईत गुन्हेगारांकडून एक पिस्तूल, एक जिवंत काडतुसे व दोन कोयते बाळगल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला. गुंडा विरोधी पथकांनी मुसक्या आवळत त्यांच्याकडून हत्यारं जप्त केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात, सूरज सिंगसाहब जैस्वाल (वय २०, रा. सुभाष पांढारकर नगर, आकुर्डी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुंडा विरोधी पथकातील कर्मचारी विजय दत्तात्रय तेलेवार यांनी सोमवारी (दि.२) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सूरज याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी सूरज याला अटक केली. त्यांच्याकडून ४० हजार रुपये किंमतीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ४० हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाइकांच्या लग्नात गोळीबार करता यावा, यासाठी आरोपीने हे पिस्तुल उत्तर प्रदेशातून आणले असल्याचे पोलीस तपासात समोर आहे. त्याने पिस्तूल हाताळत असल्याच फोटो इन्स्टाग्रामवर टाकला. याबाबतची माहिती एका नागरिकाने गुंडा विरोधी पथकाला दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली.
दुस-या प्रकरणातील मयुर अनिल सरोदे (वय २१, रा. दुर्गानगर, आकुर्डी) असे अटक केलेल्या कोयता मॅन ऊर्फ यमभाई याचे नाव आहे. गुंडा विरोधी पथकातील कर्मचारी रामदास कुंडलिक मोहिते (वय ३५) यांनी सोमवारी (दि. २) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यमभाई ऊर्फ मयूर सरोदे याच्याकडे पुन्हा कोयता असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काळेवाडीतील नगरसेवक विनोद नढे यांच्या कार्यालयाच्या जवळून सरोदे याला अटक केली. त्याच्याकडून आणखी एक कोयता पोलिसांनी हस्तगत केला.
तिस-्या प्रकरणात रा. अवधूत शर्मा (वय १८, रा. पांढरकर चाळ, दळवीनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुंडा विरोधी पथकातील कर्मचारी शुभम तानाजी कदम यांनी सोमवारी (दि. २) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शर्मा यांने कोयता तोंडात पकडलेला फोटो सोशल मीडियावर टाकला होता. याबाबतची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला चिंचवड परिसरातून अटक केली. त्याच्याकडून एक कोयता हस्तगत केला.