पिस्तूलविक्री रॅकेटमध्ये अभियंता, सात पिस्तूल, १५ काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:17 AM2018-08-30T01:17:09+5:302018-08-30T01:17:43+5:30
पोलिसांची कारवाई : सात पिस्तूल, १५ काडतुसे जप्त; विनयभंगाचाही गुन्हा दाखल
पिंपरी : निगडी येथील ओटा स्कीम भागातील रहिवासी असलेला अनुप नवनाथ सोनवणे (वय २८) हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला तरुण गुन्हेगारीकडे वळला असून, तो चक्क पिस्तूल विक्रीच्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचा साथीदार अवधूत जालिंदर गाढवे हा हॉटेल व्यावसायिक असून, गुन्हेगारी कृत्यांत आघाडीवर आहे. या दोघांकडे विक्रीसाठी आणलले देशी बनावटीची सात पिस्तुले आणि १५ काडतुसे आढळून आली. १ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला आहे. दोघांचीही यापूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.
पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात रानडे यांची पत्रकार परिषद बुधवारी झाली. या वेळी ते म्हणाले, ‘‘अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन लेबर सप्लायचा व्यवसाय करणारा अनुप सोनवणे हा तरुण गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय झाला आहे. त्याच्यावर विनयभंग आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोंगरकिनी गावचा आहे. त्याच्या निगडी येथील घराची झडती घेतली असता, चार पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे आढळून आली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने मोशी येथील अवधूत जालिंधर गाढवे या साथीदाराचे नाव सांगितले. त्यास पिस्तूलविक्री केल्याची कबुली दिली. अनुपला ३१ आॅगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवाडी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, दीपाली मरळे, हवालदार वेताळ, कैलास बाबडे, प्रमोद लांडे, राजेंद्र शेटे, प्रवीण दळे, राजेश परंडवाल, अप्पासाहेब कारकुड, महादेव धनगर, दिलीप लोखंडे, अमित गायकवाड, तानाजी गाडे, संतोष बर्गे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अनुपने दिलेल्या माहितीनुसार त्याचा साथीदार अवधूत यास आळंदी परिसरातून ताब्यात घेतले असता, त्याने अनुपकडून दोन पिस्तूल खरेदी केल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर आळंदी केळगावजवळ पिस्तुलाची चाचणी घेतल्याचेही नमूद केले. जालिंधरचा हॉटेल आणि लॉजिंगचा व्यवसाय आहे. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. आणखी एका खंडणीच्या गुन्ह्यात तो फरार होता. ताब्यात घेतल्यानंतर त्यास २८ आॅगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यास खंडणीच्या गुन्ह्यात वर्ग करून अटक केली आहे.