पवना जलपूजनानंतर पिंपरीच्या महापौरांनी दाखविली पिस्तूल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 12:30 PM2019-08-08T12:30:55+5:302019-08-08T12:31:21+5:30
अधिकाऱ्यांनी उत्सुकतेने विचारल्यानंतर मी त्यांना पिस्तूल दाखवली. मात्र, हवेत कोणताही गोळीबार केला नसून, माझ्या बदनामीसाठी अफवा पसरविली जात आहे
पिंपरी : भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या व माजी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाल्याने महापालिकेची स्थायी समिती बैठक बुधवारी तहकूब करण्यात आली. मात्र, दुसरीकडे भाजपाचे पिंपरीचे महापौर राहुल जाधव यांनी सपत्निक पवना धरणाचे जलपूजन केले. विशेष म्हणजे त्यानंतर उपस्थित अधिकारी व पदाधिकारी यांना त्यांनी नवीन घेतलेली पिस्तूल दाखविली. त्यामुळे महापौर जाधव यांच्यावर टीकेचा भडीमार होऊ लागला आहे.
पवना धरण १०० टक्के भरल्याने पाणीकपात मागे घेऊन दररोज पाणीपुरवठा करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी झाला. मात्र, महापौर जाधव यांनी पवना जलपूजनानंतरच दररोज पाणीपुरवठा सुरू करण्याचा हट्ट केला. दरम्यान, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यामुळे महापालिकेतील विविध सभा व बैठका बुधवारी रद्द करण्यात आल्या. मात्र, महापौर जाधव यांनी पवना धरणावर जाऊन पवनामाईचे पूजन केले. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, खासगी स्वीय सहायक व काही पत्रकार उपस्थित होते. या महापौरांच्या या कृतीमुळे भाजपातील काही जुन्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पवना धरणाच्या जलपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व मंडळी एका खासगी हॉटेलमध्ये गेले. या वेळी महापौैर जाधव यांनी स्वत:कडे असलेली पिस्तूल उपस्थित अधिकाऱ्यांना दाखविली. त्यानंतर त्यांचे फोटो व्हायरल झाले. त्यांनी हवेत गोळी मारल्याच्याही अफवा त्यानंतर पसरल्या. मात्र, प्रत्यक्षदर्शनी उपस्थित असलेल्या सूत्राच्या माहितीनुसार, त्यांनी अधिकाऱ्यांच्या उत्सुकतेपोटी त्यांना पिस्तूल दाखविली. परंतु, हवेत गोळीबार केला नाही, असे सांगण्यात आले.
गेल्या ८३ दिवसांपासून नागरिकांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पवना धरणाच्या जलपूजनाचा तातडीचा व नियोजित कार्यक्रम होता. मात्र, ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहून जलपूजन करण्यात आले. माझ्याकडे परवाना असलेली पिस्तूल आहे. अधिकाऱ्यांनी उत्सुकतेने विचारल्यानंतर मी त्यांना दाखविली. मात्र, हवेत कोणताही गोळीबार केला नसून, माझ्या बदनामीसाठी अफवा पसरविली जात आहे.
- राहुल जाधव, महापौर.