गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या खून प्रकरणातील आरोपीसह तिघांकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 12:30 PM2021-06-03T12:30:27+5:302021-06-03T12:30:37+5:30
वेगवेगळ्या कारवायांमध्ये १८ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पिंपरी: भोसरीतील गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या खून प्रकरणातील आरोपीसह तिघांना पोलिसांनीअटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे हस्तगत केली. भोसरी पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये १८ लाख ९५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रमोद ऊर्फ कक्काल संतराम धौलपूरिया, प्रसन्ना ऊर्फ सोनू ज्ञानेश्वेर पवार (वय २६) आणि अंकुश ऊर्फ तात्या रंगनाथ डांगले (वय २९, सर्व रा. भोसरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलिसांना आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा लावून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ९३ हजार ४०० रुपयांची तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. प्रमोद धौलपुरिया हा भोसरी येथील गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहे.
जुलै 2016 मध्ये फुगेंची हत्या
सोन्याचा शर्ट परिधान करत असल्यामुळे चर्चेत आलेल्या दत्ता फुगे यांची 15 जुलै 2016 रोजी हत्या करण्यात आली होती. पुण्यात दिघी येथील भारतमाता नगर परिसरात हा प्रकार घडला होता. पद्धतशीरपणे कट रचून फुगे यांची हत्या करण्यात आल्याचे त्यांचा मुलगा शुभमने सांगितले होते. विशेष म्हणजे दत्ता फुगे यांचा मुलगा शुभमच या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदारही आहे. त्यांची पत्नी सीमा फुगे या माजी नगरसेविका आहेत.
वेगवेगळ्या कारवायांमध्ये भोसरी पोलिसांनी१८ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
दुसऱ्या कारवाईत राजेश बैजू नेटके (वय २३) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. कासारवाडी व दापोडी परिसरात गाड्या अडवून हत्याराचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या आरोपींबाबत तपास करताना पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानुसार नेटकेला ताब्यात घेतले. त्याने त्याचे साथीदार सागर राजू नायर (वय १९) व सिद्धार्थ उर्फ भाव्या (रा. कासेवाडी झोपडपट्टी, पुणे) यांच्या मदतीने जबरी चोरी केलेला ५२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यांच्याकडून भोसरी व सांगवी पोलीस ठाण्याचे तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
भोसरी परिसरात संशयित वाहन चोर फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार संशयित अक्षय संतोष मोरे (वय २४) याला ताब्यात घेतले. त्याने त्याचे साथीदार राहुल गणेश पाटील (वय २३), अक्षय बब्रुवान खोसे (वय २१), गणेश बबन जानराव (वय २२) यांच्या मदतीने चोरी केलेल्या १२ दुचाकी, असा आठ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. वाहनचोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
भोसरी परिसरात संशयित वाहन चोर फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अरशद हनिफ सय्यद (वय २१), अनिकेत सचिन झेंडे (वय २०) व दोन विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १३ गुन्हे उघडकीस आणून एकूण नऊ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.