पिंपरीत नगरसेविका, उद्योजिका, गृहिणींसह शेतकरी महिलांकडेही पिस्तूल; स्वसरंक्षणासाठी घेतला शस्त्र परवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 02:27 PM2022-02-06T14:27:47+5:302022-02-06T14:46:30+5:30

शहरात खून, खुनाचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यातही महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे

Pistols in Pimpri corporators industrialists housewives as well as women farmers Weapons licensed for self defense | पिंपरीत नगरसेविका, उद्योजिका, गृहिणींसह शेतकरी महिलांकडेही पिस्तूल; स्वसरंक्षणासाठी घेतला शस्त्र परवाना

पिंपरीत नगरसेविका, उद्योजिका, गृहिणींसह शेतकरी महिलांकडेही पिस्तूल; स्वसरंक्षणासाठी घेतला शस्त्र परवाना

googlenewsNext

नारायण बडगुजर

पिंपरी : शहरात खून, खुनाचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यातही महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. परिणामी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शस्त्रांना मागणी वाढली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १८ महिलांनी शस्त्र परवाना घेतला असून, त्यात नगरसेविका, उद्योजिका, व्यावसायिका तसेच शेतकरी महिलेचा देखील समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२१ मध्ये १०४५१ तर २०२० मध्ये ९४७२ गुन्हे दाखल झाले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल होताच गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. यात विनयभंग, छेडछाड, लैंगिक अत्याचार, बलात्कार, असे महिलांविषयक गुन्हे मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे महिला सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. काही महिला, तरुणी स्वसंरक्षणासाठी तत्पर असतात. विविध प्रशिक्षणासह कायदेशीर शस्त्र बाळगण्यास त्यांच्याकडून प्राधान्य दिले जात आहे.

राजकीय, जमिनीशी संबंधित वाद

पिंपरी-चिंचवड शहरातील काही नगरसेवक तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याचे तसेच खून झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. तसेच पराकोटीचे राजकीय शत्रूत्व यातून देखील असे हल्ले केले जातात. जमीन तसेच मिळकतींच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने त्यात वाद निर्माण होतात. यातून खून, खुनाचा प्रयत्न असे प्रकार देखील होत आहेत. यात महिलांवर देखील हल्ले केले जात आहेत. त्यामुळे महिला देखील स्वसंरक्षणासाठी पिस्तुलाचा परवाना घेत आहेत.

महिलांचे प्रमाण अत्यल्प

महिलांचा राजकीय, सामाजिक तसेच उद्योग यासह विविध क्षेत्रांत वावर वाढत आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला नेतृत्व करीत आहेत. त्यात त्यांना जोखीम देखील पत्कारावी लागते. यातून त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो. असे असले तरी महिलांकडून शस्त्र परवाना घेण्यात उदासीनता दिसून येते. त्या तुलनेत शस्त्र परवाना घेण्यात पुरुष आघाडीवर आहेत. पोलिसांच्या परवाना शाखेकडे रितसर अर्ज करून आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यास महिलांना देखील शस्त्र परवाना मिळू शकतो.

नगरसेविकांच्या पतीराजांकडे पिस्तूल

राजकारणात सक्रिय असलेल्या महिलांमध्ये शस्त्र बाळगण्याची ‘क्रेझ’ वाढत आहे. आपला राजकीय चेहरा म्हणून पत्नीला पुढे करून राजकारण करणारे पतीराज देखील शस्त्र परवाना घेण्याच्या प्रयत्नात आहेत. यातील काही नगरसेविकांच्या पतीराजांनी शस्त्र परवाना मिळवून पिस्तूल घेतले आहे.

आवश्यक नसलेल्या शस्त्राची माहिती दिली का?

परवाना घेतल्यानंतर त्याचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे. शस्त्र आवश्यक नसल्यास त्याबाबत पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे. मात्र काही जणांकडून अशी माहिती दिली जात नाही. त्यांच्याशी पोलिसांकडून संपर्क साधण्यात येत आहे. परवान्याचे मुदतीत नुतनीकरण न केल्यास त्याला दंड आकारण्यात येतो.

या महिलांकडे आहे शस्त्र परवाना

नगरसेविका - ३
खेळाडू - ४
गृहिणी - २
समाजसेविका - २
व्यावसायिका - २
वकील - १
शेतकरी - १
उद्योजिका - १
खासगी कंपनीतील अधिकारी - १
इतर - १

Web Title: Pistols in Pimpri corporators industrialists housewives as well as women farmers Weapons licensed for self defense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.