जागा ६९ अन् विद्यार्थी ७ लाख!, शासनाकडून थट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 04:57 AM2018-01-01T04:57:34+5:302018-01-01T05:22:35+5:30
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रकाशित झाली. राज्यभरात ७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना आयोगाकडून केवळ ६९ पदांसाठी जाहिरात काढण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.
दीपक जाधव
पुणे : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रकाशित झाली. राज्यभरात ७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना आयोगाकडून केवळ ६९ पदांसाठी जाहिरात काढण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. यंदा किमान ४०० ते ५०० जागांची जाहिरात निघेल या आशेवर गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करणाºया उमेदवारांमध्ये यामुळे तीव्र नाराजीची भावना पसरली आहे.
राज्य सेवेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जागा ६), वित्त व लेखा सेवा सहायक संचालक (जागा ८), तहसीलदार (जागा ६), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (जागा ४), कक्ष अधिकारी (जागा २६), सहायक गटविकास अधिकारी (जागा १६), उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (जागा २), सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क (जागा १) अशा एकूण ६९ जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
खासगी क्षेत्रातील नोकºयांवर गदा आली. प्राध्यापक, शिक्षक पदाची भरती बंद आहे. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा एकमेव मार्ग उरला आहे. त्यामुळे कला, वाणिज्य, विज्ञान ते डीएड, बीएड, इंजिनिअरिंग, मेडिकल या पदव्यांचे शिक्षण घेत असतानाच मोठ्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेसाठी देशभरातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागते. त्या तुलनेत राज्य सेवेसाठी होणाºया परीक्षेला जास्त संधी असल्याने त्याची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेच्या दुष्टचक्रात विद्यार्थी अडकू लागले आहेत. राज्यात २००४च्या सुमारास राज्य सेवेच्या भरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे उजेडात आले होते. त्यानंतर अनेक वर्षे राज्यसेवेच्या परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले होते.
सोशल मीडियावर उमटताहेत पडसाद
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांचे अनेक व्हॉट्स अॅप ग्रुप आहेत. यंदा राज्य सेवेच्या परीक्षेसाठी केवळ ६९ जागांची जाहिरात निघाल्याने त्याचे तीव्र पडसाद व्हॉट्स अॅप ग्रुपवर उमटण्यास सुरूवात झाली आहे. नटसम्राट नाटकातील स्वगत, नाना पाटेकर यांचे डायलॉग याचे विडंबन करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांची व्यथा मांडली जात आहे. त्याचे अनेक व्हिडीओ यू ट्यूब, व्हॉट्स अॅप ग्रुपवर शेअर केले जात आहेत.