पालखी मार्गावरील झाडे मृतावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:43 AM2018-11-16T00:43:15+5:302018-11-16T00:43:36+5:30
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : पाण्याअभावी दुभाजकातील हिरवळ सुकली; आळंदी-दिघी रस्त्यावरील समस्या
दिघी : आळंदी-दिघी पालखी मार्गाच्या रुंदीकरणात शेकडो झाडांवर कुºहाड कोसळली. त्यामुळे हिरवळीने गर्द झालेला रस्ता अचानक ओसाड वाटू लागला. रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी झाडे मुळासकट उपटून त्यांचे दुसऱ्या जागेत पुनर्रोपण करण्यात आले.
रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असताना पालखीमार्गावरील दुभाजक व मार्गाच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करण्यात आले. मात्र महापालिकेच्या निर्दयी प्रशासनाने या वृक्षांकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी पाण्याअभावी पालवी फुटलेली झाडे मृतावस्थेत जात आहेत.
रस्ता रुंदीकरण करताना किंवा अन्य विकास प्रकल्पांमुळे बाधीत झाडे तोडून न टाकता त्यांचे पुनर्रोपण करण्याचे महापालिकेचे धोरण आहे. मात्र पुनर्रोपण केल्यानंतर या झाडांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आळंदी-दिघी पालखी मार्गावरील पुनर्रोपण करण्यात आलेली झाडे पाणी आणि देखभालीअभावी सुकली आहेत. तसेच या मार्गावर झाडांचे पूर्ण पुनर्रोपण करण्यात आलेले नाही आणि नव्याने रोपणही करण्यात आलेले नाही. त्यामुळे या मार्गावरील दुभाजक ओसाड पडले आहेत.
आळंदी-दिघी मार्गावरील वडमुखवाडी येथील साई मंदिर ते दिघीतील मॅगझिन चौकातील डोंगराच्या बाजूला मोकळ्या जागेत या स्थलांतरीत वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले होते. ज्या झाडांच्या मुळ्या रूजल्या ती झाडे पालवी फुटून बहरत आहेत. बोडख्या झालेल्या फांद्या हिरवाईने नटू पाहत आहेत. मात्र पाण्याअभावी अशा अवस्थेत त्यांचे आयुष्य संपल्यात जमा आहे. काही झाडे उन्मळून पडली आहेत. दुभाजकांमधील व रस्त्याच्या बाजूला लावलेली झाडांची अवस्था पाण्याअभावी सुकून, पाने गळून पडली आहेत. झाडांना आळे नाहीत, दगडधोंड्यांचा खच झाडांच्या बुंध्याशी पडून आहे. मोझे शाळेलगत रस्त्याच्या दुभाजकांमध्ये लावलेली दहा फूट उंच झाडे आधार नसल्याने कोलमडून पडली आहेत. मॅगझिन चौकापासून दत्तनगरकडे जाणाºया रस्त्यावर उजव्या बाजूला वृक्ष लागवड केली गेली. मात्र काही व्यावसायिकांनी जागा काबीज करीत येथे व्यवसाय सुरू केला आहे. अंधाराचा फायदा घेत काही नागरिक परिसरात कचरा टाकतात. त्यामुळे या झाडांना बाधा पोहचत आहे. हा कचरा झाडांच्या मुळावर उठला आहे. त्यामुळे येथील झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
यंत्रणेचा पूरेपूर वापर नाही
1वृक्षारोपणासह त्यांच्या संवर्धनावर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडे स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित आहे. असे असतानाही या यंत्रणेचा पुरेपूर वापर करण्यात येत नाही. परिणामी वृक्षसंवर्धन होत नाही. पुरर्रोपण करून किंवा रोपांची नव्याने लागवड करूनही फारसा उपयोग होत नाही. काही दिवसांतच ही झाडे सुकतात. मृतावस्थेतील ही झाडे महापालिकेकडून लगेच हटविण्यात येतात.
लागवडीपेक्षा झाडे हटविण्याची मोहीम
2आळंदी-दिघी पालखी मार्गावरील दुभाजकांमध्ये लावलेली झाडे सुकून गेल्याने ती लगेच हटविण्यात आली होती. पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक झाडे सुकली आहेत. काही झाडे मृतावस्थेत आहेत. ही सर्व झाडे महापालिका प्रशासनाकडून हटविण्यात येतील. त्यामुळे हा मार्ग आणखी ओस होणार आहे. महापालिका प्रशासनाने लागवडीपेक्षा झाडे काढण्याची मोहीम सुरू केली आहे का, असा उपरोधिक प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
झाडांभोवती खडी, पेव्हिंग ब्लॉक
3दत्तनगरपासून विठ्ठल मंदिरकडे जाणाºया रस्त्यावरील दुभाजक मात्र झाडांअभावी ओस पडले आहेत. रस्त्याच्या दुभाजकांमध्ये लावलेली झाडांना मातीचा अभाव असल्याचे दिसून येते. वृक्षलागवड करताना काळ्या मातीचा भराव टाकला नाही. रस्त्यावरील खडी, सिमेंटचे ब्लॉक, विटांच्या तुकड्यांचा खच झाडाभोवती टाकलेला तसाच पडून आहे. वृक्षारोपण करण्याची ही अनोखी पद्धत महापालिका प्रशासनाने कधीपासून अस्तित्वात आणली, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. अशा पध्दतीमुळे या झाडांचे संवर्धन होण्याऐवजी नुकसानच अधिक होत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ही झाडे सुकून मृतावस्थेत आहेत. यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.