Plastic Ban : प्लॅस्टिक बंदीबाबत नागरिकांत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 03:01 AM2018-06-24T03:01:48+5:302018-06-24T03:02:35+5:30
प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी नागरिकांमध्ये योग्य प्रकारे जनजागृती होणे गरजेचे असते. मात्र, जनजागृतीपेक्षा कायद्याचा धाक दाखवीत अंमलबजावणीच्या सबबीखाली शासकीय यंत्रणेचा दंड
पिंपरी : प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी नागरिकांमध्ये योग्य प्रकारे जनजागृती होणे गरजेचे असते. मात्र, जनजागृतीपेक्षा कायद्याचा धाक दाखवीत अंमलबजावणीच्या सबबीखाली शासकीय यंत्रणेचा दंड आकारणीवर भर दिसून आला. नेमक्या कोणत्या प्लॅस्टिकच्या वस्तूंवर बंदी आहे, कोणत्या नाही, पर्याय काय, याबद्दल अनभिज्ञता असल्याने नागरिकांत संभ्रम दिसून आला. मात्र, महापालिका प्रशासनाने कारवाई करीत सुमारे ८० हजार रुपयांचा दंड वसूल केला.
महापालिकेने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर प्लॅस्टिक जमा करण्यासाठी विभागवार केंद्रे सुरू केली. बाजारपेठेत प्लॅस्टिक जमा करण्यासाठी यंत्रणा उभारण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र प्लॅस्टिक बंदी सुरू झाली, तरी नेमकी अंमलबजावणी होऊ शकली नाही. प्लॅस्टिक पिशव्या,प्लॅस्टिक चमचे, काच, ग्लास, स्ट्रॉ, तसेच थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या आणि उत्पादने साठविण्यासाठीची प्लॅस्टिक आवरणे, द्रव पदार्थ साठवणुकीसाठी वापरात येणारे प्लॅस्टिक, सजावटीच्या वस्तू या प्लॅस्टिक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. औषधांचे वेष्टन, अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या, नर्सरीत वापरले जाणारे प्लॅस्टिक, टिफिन, डिस्पोजेबल बॅग, टीव्ही, फ्रिज यांसारख्या उत्पादनासाठी वापरले जाणारे थर्माकोल, बिस्कीट, वेफर अशा खाद्यपदार्थांच्या पुड्यांचे वेस्टन यास बंदी घातलेली नाही.
स्वच्छता अभियानात ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण कसे करावे, वेगवेगळ्या बकेटमध्ये कचरा जमा करावा. यासाठी महापालिकेने जनजागृतीवर लाखो रुपये खर्च केला. ध्वनिक्षेपक लावलेल्या रिक्षाच नव्हे, तर मोठे टेम्पो शहरातून फिरविले. एवढेच नव्हे, तर मिळकतकर वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर बँडपथके नेण्याचा खर्च केला. प्लॅस्टिक बंदीबाबतचे अभियान राबविताना मात्र महापालिकेचा उत्साह दिसून येत नाही.
प्लॅस्टिकबंदीचा नियम पहिल्यांदा मोडल्यास पाच हजार रुपये, दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास दहा हजार आणि तिसºयांंदा २५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. शिवाय तीन महिने तुरुंगवासाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी आणि या मोहिमेत काम करणारे कर्मचारी आता दंडवसुलीसाठी सज्ज झाले आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या पुढाकाराने शहरात विविध ठिकाणी प्लॅस्टिक बंदीची मोहीम राबवली. एकूण १६ आस्थापनांची पाहणी करून तेथील ११५ किलो प्लॅस्टिक जप्त केले. तसेच त्यांच्याकडून ८० हजारांची दंडवसुली करण्यात आली. महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी प्लॅस्टिक बंदीची मोहीम राबवण्यात आली.
तीन महिन्यांत अडीच लाखांचा दंड वसूल
पिंपरी : प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची शनिवारपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. महापालिकेने त्यासाठी बंदीची मोहीम राबवली असून, शहरातील दुकाने, हॉटेलांची तपासणी करण्यात आली. मागील तीन महिन्यांत ५२ जणांविरोधात दंडात्मक कारवाई करून दोन लाख ५२ हजारांचा दंड वसूल केला आहे.
प्लॅस्टिकबंदी आणि दंडात्मक कारवाईबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. प्लॅस्टिकच्या पिशव्या, चमचे, ग्लास, स्ट्रॉ, थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या, उत्पादने साठविण्यासाठी असलेली प्लॅस्टिकची आवरणे, द्रवपदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक, अन्नपदार्थ साठविण्यासाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक, प्लॅस्टिक व थर्माकोल डेकोरेशन यावर बंदी घालण्यात आली आहे. २३ मार्च रोजी राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदीची अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर या वस्तूंचा साठा संपण्यासाठी २२ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती.
अ क्षेत्रीय कार्यालय वगळता अन्य क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत अधिकाºयांनी बंदी असताना ज्यांच्याकडे प्लॅस्टिक आढळून आले, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.
ब क्षेत्रीय कार्यालय हद्दीत चार दुकानांतील नऊ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून २० हजारांची दंडवसुली केली.
क क्षेत्रीय कार्यालय हद्दीत चार दुकानदारांकडून ७.२ किलो प्लॅस्टिक साठा जप्त करून २० हजारांची दंडवसुली केली.
ड क्षेत्रीय कार्यालय हद्दीत दोन दुकानदारांकडून ४५ किलो प्लॅस्टिक जप्त केले. त्यांच्याकडून १० हजार दंड वसूल केला.
ई क्षेत्रीय कार्यालय हद्दीत चार किलो प्लॅस्टिक जप्त केले.
फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत चार किलो प्लॅस्टिक जप्त करून पाच हजारांचा दंड वसूल केला आहे.
ग क्षेत्रीय कार्यालय हद्दीत २० किलो प्लॅस्टिक जप्त केले. तसेच १५ हजारांची दंडवसुली झाली.
ह क्षेत्रीय कार्यालय हद्दीत २६ किलो प्लॅस्टिक जप्त करून १० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
एकूण ११५.१ किलो प्लॅस्टिक जप्त करून महापालिकेने ८० हजारांचा दंड वसूल केला आहे.