‘प्ले ग्रुप’, ‘नर्सरी’मधून होतेय लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 07:02 AM2018-04-27T07:02:46+5:302018-04-27T07:02:46+5:30
तीन वर्षांचा नियम पायदळी तुडवून बहुतांश शाळांमध्ये वयाच्या दुसºया वर्षांतच मुलांना शाळेत दाखल करून घेण्याचे प्रकार सुरू आहेत.
रावेत : शाळा या संकल्पनेची ओळख व्हावी यासाठी बालवर्ग किंवा ‘केजी’ पूर्वी ‘नर्सरी’ हा टप्पा सुरू झाला. मात्र काही काळातच नर्सरी हा शिक्षणाचा पहिला टप्पा मानण्यात येऊ लागला. त्यामुळे आता मुलांना नर्सरीची ओळख व्हावी म्हणून नर्सरीपूर्व ‘प्ले ग्रुप’ वर्ग सुरू करण्याची पद्धत रूढ झाली. ‘प्ले ग्रुप’ किंवा नर्सरी अशा नावाखाली अवास्तव शुल्क आकारून चालवण्यात येणाऱ्या शाळांना शिक्षण विभागाकडून कोणताही चाप लावला जात नाही.
तीन वर्षांचा नियम पायदळी तुडवून बहुतांश शाळांमध्ये वयाच्या दुसºया वर्षांतच मुलांना शाळेत दाखल करून घेण्याचे प्रकार सुरू आहेत. विशेष म्हणजे यावर शासनाचे अजिबात नियंत्रण नसल्याने मनमानी शुल्क आकारणी करून अशा शाळा आपला गल्ला भरताना दिसतात. स्थानिक शिक्षण संस्थांशी संलग्न असलेल्या शाळा वगळता इतर बहुतेक सर्व खासगी शाळांनी प्रवेशाच्या वयाचा निकष धाब्यावर बसवला.
कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता शहरातील बहुतांश भागात प्ले ग्रुपच्या नावाने पालकांच्या लुटीचा खेळ काही जणांनी सुरू केला आहे. शिक्षणाच्या नावाखाली दुकाने थाटणाºया काही शाळांना प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजीत मुबलक पैसा मिळतो अर्थात तो मिळविला जातो. अनेक शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांना आधी डोनेशन दिले तरच प्रवेश सुकर होतो. काही शाळा तर प्रवेशा अगोदर डोनेशन तर घेतातच शिवाय पालक आणि पाल्ल्यांच्या मुलाखतीही घेतात. प्री-प्रायमरीत या उद्योगातून मागील काही वर्षात नोटांचा वर्षावच होत असल्याने सध्या गल्लोगल्ली, शहरातील, परिसरातील मिळेल त्या भागात, जागेत गोंडस नावाखाली प्ले ग्रुप, नर्सरी, केजी अशा शाळांचे पेव फुटले आहे. यावर शिक्षण विभागाचे फारसे नियंत्रण नाही. खासगी इंग्रजी शाळांचे मोठे पीक आलेले असताना शहरात गेल्या काही वर्षात प्ले ग्रुप, नर्सरी, केजीचे शिक्षण देणाºया शाळांची लाट आलेली आहे. अगोदर निवासी वापरासाठी असलेल्या बहुतांश जागेत या अशा अनेक शाळा सुरू झाल्या.
प्ले ग्रुप सुरू करण्यासाठी खास नियोजन, खास इमारतीच्या फंद्यात संबंधित पडत नाहीत. छोटासा प्लॉट, पाच-सहा दुकाने असलेले ठिकाण, फ्लॅटमध्ये प्री-प्रायमरी सुरू केली जाते. येथील भिंती रंगवून, थोडीशी खेळणी, आकर्षक सुविधा देण्याच्या नावाखाली ही प्री-प्रायमरी दुकानदारी अनेक ठिकाणी सुरू असते.
सुविधांचा अभाव
४प्ले ग्रुप, नर्सरी, केजीत प्रवेश घेतलेल्या सहा वर्षांच्या आतील मुलांना पुरेसे खेळाचे मैदान, खेळणींची आवश्यकता असते. मात्र, अनेक ठिकाणी छोट्याशा प्लॉटवर सुरू झालेल्या या शाळांमध्ये सर्वच मुलांना बसण्यासाठी पुरेशी जागाच नसते. शाळांसमोर नावालाच एक-दोन खेळणी ठेवलेली असतात. एकप्रकारे यामध्ये चकाकीपणा आणून पालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. चांगल्या नर्सरीत आपल्या पाल्ल्याने शिक्षण घ्यावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मात्र अमूक एका नर्सरीलाच प्रवेशाची रांग दिसली की पालकही त्याच नर्सरीच्या दिशेने वळतात.
पालकांकडून होत नाही शहानिशा
४काही महिला संबंधित वर्गासाठीचा अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्या नसतानाही शिक्षिका व चालक झाल्या आहेत. नर्सरी स्कूल अधिकृत आहे का याची शहानिशा पालकांकडून करण्यात येत नाही. घरापासून जवळ असलेल्या वर्गात प्रवेश घेण्यावर भर देण्यात येतो. बहुतांश पालक आपल्या वेळेच्या सोयीनुसार वर्ग निवडतात. त्यामुळे अशा वर्गचालकांचे फावते.
निकषाला कोलदांडा
४पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी ३० विद्यार्थ्यांचा पट असणे आवश्यक आहे. नियमानुसार एका शिक्षिकेकडे २० विद्यार्थी आवश्यक आहेत. मात्र बºयाच नर्सरीमध्ये शेकडो मुलांसाठी एक किंवा दोनच शिक्षिका आहेत. पाल्ल्यासाठी तीन ते सहा वयोगटाची पात्रता आहे. मात्र या वयोगटाचे निकष पाळले जात नाहीत. सर्व नियमांना कोलदांडा देत असे वर्ग चालविले जातात.
नर्सरींचा पालकांपर्यंत पोहोचण्याचा आटापिटा
४पिंपरी, चिंचवड, रावेत, वाल्हेकरवाडी, प्राधिकरण, निगडी आदी भागांत खासगी नर्सरी आहेत. सध्या शहरात साधारणपणे ३०० ते ३५० खासगी नर्सरी जोमात सुरू आहेत. येथे ३० ते ४० हजार रुपये डोनेशन आकारले जाते. काही नर्सरी प्रसिद्धीच्या नावाखाली विविध फंडे वापरतात. पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू असतो. विविध जाहिराती, प्रलोभने दाखविली जातात. त्याला अनेक पालक बळी पडतात. काही धनदांडगी मंडळी पैसा भरून अशा वर्गांत पाल्ल्याचा प्रवेश घेतात.