भूखंड स्वमालकीचाच; विकसकाचा दावा
By admin | Published: June 7, 2017 01:27 AM2017-06-07T01:27:29+5:302017-06-07T01:27:29+5:30
मित्रमंडळ चौकातील महापालिकेच्या मालकीचा भूखंड व ज्यावर कुंपण बांधले आहे तो भूखंड वेगवेगळा असल्याचा दावा संबंधित विकसकाच्या वतीने करण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मित्रमंडळ चौकातील महापालिकेच्या मालकीचा भूखंड व ज्यावर कुंपण बांधले आहे तो भूखंड वेगवेगळा असल्याचा दावा संबंधित विकसकाच्या वतीने करण्यात आला आहे. महापालिकेने मात्र हा भूखंड एकच असल्यावरून न्यायालयात दावा दाखल झाला व त्याचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागला असल्याचे स्पष्ट केले आहे. या जागेबाबत न्यायालयाच्या जैसे थे आदेशाचा भंग केल्यावरून महापालिकेने दाखल केलेल्या अवमान याचिकेची सुनावणी ८ जूनला होणार आहे.
गेल्या महिनाभरापासून मित्रमंडळ चौकातील सुमारे ९ एकर भूखंडांचे प्रकरण महापालिकेत गाजते आहे. काँग्रेसचे माजी उपमहापौर, नगरसेवक आबा बागुल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी याविरोधात महापालिका प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवला आहे. त्यानंतर महापालिकेने अवमान याचिका दाखल केली आहे. मात्र याबाबत बोलताना सुभाष जगताप यांनी सांगितले की महापालिकेने फक्त त्या जागेवर विकसकाने घातलेले कुंपण काढण्याचा आदेश द्यावा.
>मालमत्ता सांभाळण्याची जबाबदारी आयुक्तांची
महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सतीश कुलकर्णी यांनी हा संपूर्ण ९ एकरांचा भूखंड महापालिकेचाच असल्याचे सांगितले. त्याचा क्रमांक एकच आहे, त्याचे प्लॉट पडलेले नाहीत, त्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता व त्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयापर्यंत महापालिकेच्या बाजूने लागला आहे, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने मूळ जागामालकाचे म्हणणे ऐकून घ्यावे, असा आदेश कनिष्ठ न्यायालयाला दिला. त्यानंतरही निकाल महापालिकेच्याच बाजूने लागला. त्याविरोधात अपील करण्यात आले असून, त्याची सुनावणी प्रलंबित आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.
दरम्यान, या सर्व प्रकरणांत महापालिका प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त कुणाल कुमार का गप्प आहेत, असा सवाल बागुल यांनी केला. महापालिकेच्या सर्व मालमत्ता सांभाळण्याची अंतिम जबाबदारी आयुक्तांची आहे. या प्रकरणात त्यांच्या अधिकाऱ्यांकडून बेजबाबदारपणा झाला आहे हे उघड दिसत असूनही आयुक्त काही करायला तयार नाहीत, ते राजकीय दबावाखाली येऊन काम करीत आहेत हे यातून स्पष्ट दिसते आहे, असा आरोप बागुल यांनी केला.
सुभाष जगताप यांनीही संबंधित विभागप्रमुखांवर कारवाई करण्याची मागणी केली असून, महापालिकेच्या मालकीची जागा हडप करण्याचा हा डाव आपण यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगितले.