पीएमपी प्रशासनाचे दुर्लक्ष : प्रशिक्षणाविनाच दिले स्टेअरिंग चालकांच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 01:08 AM2018-12-29T01:08:41+5:302018-12-29T01:08:53+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस विविध मार्गांवर धावतात. यामध्ये खात्याच्या, तसेच ठेकेदाराच्या बसचाही समावेश आहे.
- मंगेश पांडे
पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस विविध मार्गांवर धावतात. यामध्ये खात्याच्या, तसेच ठेकेदाराच्या बसचाही समावेश आहे. मात्र, ठेकेदाराच्या बसवरील चालकांना प्रवासी बस चालविण्याचे प्रशिक्षणच दिले जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ठेकेदाराकडील चालक प्रशिक्षणाशिवायच बस चालवीत असून, एकप्रकारे पीएमपी प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह लगतच्या परिसरातील नागरिकांना प्रवासासाठी पीएमपी बसचा सक्षम सुविधा आहे. शहरातील विविध मार्गांवर बस सोडल्या जात असून, यामुळे नागरिकांचा प्रवास सोयीचा होत आहे. दरम्यान, अनेक नागरिक खासगी वाहनांचा वापर न करता पीएमपी बसने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र, या बसचा प्रवास सुरक्षित आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
ठेकेदाराकडील चालकांना ट्रेनिंगच दिले जात नसल्याचे समोर येत आहे. सध्या पीएमपीएमएलला वेगवेगळ्या पाच ठेकेदारांकडून बस पुरविल्या जातात. सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी ४३० बस ठेकेदाराच्या मार्गावर धावत असतात. यामध्ये बीआरटीएस मार्गावरील ३०० बसचाही समावेश आहे. ठेकेदाराच्या ४३० बसवर सकाळ आणि सायंकाळ अशा दोन शिफ्ट मिळून ८६० चालक असतात.
मात्र, या चालकांना खात्याच्या चालकांप्रमाणे प्रवासी बस चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. ठेकेदाराकडे एखादा चालक नोकरीसाठी आल्यास त्याला रुजू करून घेत थेट पीएमपी बसचे स्टेअरिंग त्या चालकाच्या हाती दिले जाते. त्यामुळे थांब्यावर बस थांबविणे, बीआरटीएस मार्गात बस चालविणे, मार्गावरील बसथांबे आदींबाबत चालक अनभिज्ञ असतात. यामुळे प्रवाशांचीही गैरसोय होते. तसेच प्रशिक्षित चालक नसल्याने प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचाही प्रकार सुरू आहे. तर, पीएमपीकडे असलेल्या खात्याच्या बसवरील ३ हजार चालकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते.
एकच बस बॅचबिल्ला वापरतात अनेक चालक
१प्रवासी बस चालविण्यासाठी वाहन परवान्यासह बॅचबिल्ला आवश्यक असतो. मात्र, ठेकेदाराकडील अनेक चालकांकडे बॅच बिल्ला उपलब्ध नाही. त्यामुळे इतर चालकांचा बॅचबिल्ला घेऊन मार्गावर बस चालविली जाते. हे प्रकार रोखण्यासाठी पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी या चालकांची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
२बीआरटीएस मार्गिकेतून धावणाºया बसवरील चालकांनाही प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. मात्र, प्रशिक्षण न देताच चालकांच्या हाती बस दिली जाते. त्यामुळे थांब्यापासून एक ते दीड फूट दूर अंतरावर बस थांबविणे, प्रवासी बस बसमध्ये बसला अथवा उतरला आहे की नाही याची खात्री न करताच बस हलविणे असे प्रकार घडत असतात. काही चालक तर बीआरटीएस मार्गिकेतून बस चालविताना अक्षरश: गोंधळून जातात. या मार्गिकेचा अंदाज येत नसल्याने वेग कमी कमी करून कशीबशी बस मार्गिकेच्या बाहेर काढली जाते, अशी विदारक स्थिती दिसून येते.
३प्रवासी बस चालविणे अत्यंत जबाबदारीचे काम आहे. पीएमपीकडील खात्याच्या चालकांना तीन प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, ठेकेदाराकडील चालकाला कोणत्याही प्रकारचे प्रवासी बस चालण्यिाचे प्रशिक्षण दिले जात नाही. प्रशिक्षणाविनाच चालकाच्या हाती बसचे स्टेअरिंग दिले जाते, अशी धक्कादायक माहिती पीएमपीएमएलच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली.
पीएमपीकडून खात्याच्या चालकांना दिले जाणारे प्रशिक्षण
नवीन भरती ट्रेनिंग
१ महिना
उजळणी प्रशिक्षण
दरवर्षी ३ दिवस
पीएमपीच्या खात्याच्या चालकाप्रमाणे ठेकेदाराकडील चालकाला पीएमपीकडून प्रशिक्षण द्यायचे असल्यास प्रतिचालक २०० रुपये इतका खर्च येऊ शकतो. हा खर्च कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत असल्याने ठेकेदाराकडून प्रशिक्षणाविनाच चालकाच्या हाती बसचे स्टेअरिंग दिले जात आहे.
खात्याचे चालक ३०००
ठेकेदाराकडील चालक - ८६०
बीआरटी बसवरील खात्याचे चालक - २००
ठेकेदाराचे चालक - ३००