पीएमपी आगारात दहाची नाणी धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 01:33 AM2018-11-07T01:33:36+5:302018-11-07T01:33:54+5:30
दहाचे नाणे चलनात असतानाही बँकेकडून ते स्वीकारले जात नसल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळापुढे (पीएमपी) मोठी अडचण निर्माण झाली आहे.
पिंपरी : दहाचे नाणे चलनात असतानाही बँकेकडून ते स्वीकारले जात नसल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळापुढे (पीएमपी) मोठी अडचण निर्माण झाली आहे. दररोज प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात येणारी दहाची नाणी पीएमपी आगारात जमा होत असून, या नाण्यांची अक्षरश: पोती भरून आगारातच ठेवण्याची वेळ आली आहे.
शहरातील विविध मार्गांहून पीएमपीच्या शेकडो बस धावतात. दरम्यान, प्रवासावेळी प्रवाशाने तिकिटासाठी दहाचे नाणे दिल्यास अनेकदा वाहकाकडून ते स्वीकारले जात नाही. ‘आगारात नाणी जमा करून घेतली जात नाहीत, तर आम्ही घेऊन काय करू’ असे वाहकाकडून प्रवाशाला सांगितले जाते. दहाचे नाणे चलनात असल्याचे सांगत ते घ्यायला हवे, अशी भूमिका प्रवासी घेतात. यावरून अनेकदा वादावादी होते.
बँक नाणी घेत नसल्याने प्रवासात प्रवाशांकडून जमा होणारी नाणी मार्गावरच संपवा, असे वाहकांना सांगण्यात आले आहे. यासह २५ ते ३० रुपयांपेक्षा अधिक चिल्लर आगारात आणू नका, अशीही सूचना दिली आहे. मात्र, दररोज चार ते पाच हजार रुपये भरणा असणाऱ्या एका वाहकाकडे २५ ते ३० रुपयांपेक्षा अधिकच चिल्लर जमा होत असते. अशा वेळी काय करायचे, असा प्रश्न वाहकांपुढे उभा ठाकला आहे.
अशी आहे नोटीस
पीएमपीकडून होणाºया रोजच्या भरण्यामध्ये एकही दशमान नाण्याचा स्वीकार करणार नाही, असे बँकेने कळविले आहे. तरी वाहकांनी मार्गावर काम करताना प्रवाशांकडून तिकीट आकारणीपोटी आलेले सुटे पैसे दुसºया प्रवाशांस देऊन कमीत कमी सुटी नाणी आगारात भरणा करताना द्यावी. प्रत्येक वाहकाने कमीत कमी २० ते २५ रुपये किंवा त्यापेक्षा कमी नाणी भरावीत. त्यामुळे बँकेत भरणा करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.
आगारांमध्ये
हजारो नाणी
प्रवाशांकडून दहाची नाणी येतात. मात्र, बँक त्या स्वीकारत नसल्याने गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून आगारातच ठेवण्याची वेळ आली आहे. निगडी, नेहरुनगर, तसेच भोसरी आगारात हजारो रुपयांची १० ची नाणी आहेत. भोसरी आगारात ८० हजारांची नाणी पडून आहेत.
प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात दहाची नाणी येत असतात. मात्र, सध्या बँक ही नाणी स्वीकारत नसल्याने ही नाणी आगारातच ठेवली आहेत. बँकांनी नाणी स्वीकारल्यास सोयीचे होईल.
- सतीश गव्हाणे, आगार व्यवस्थापक, निगडी