पीएमपी प्रवाशांची होतेय आर्थिक लूट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 12:55 AM2019-01-07T00:55:22+5:302019-01-07T00:56:03+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : जास्त-कमी अंतरासाठी सारखेच तिकीट
मंगेश पांडे
पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) अनेक मार्गांवर जास्त अंतरासाठी जितका तिकीट दर आकारला जात आहे, तितकाच दर कमी अंतरासाठीही आकारला जात असल्याने यातून प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. पीएमपीच्या बस पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह लगतच्या अनेक मार्गांवर धावतात. या बसमधून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. मात्र, अनेक मार्गांवर प्रमाणापेक्षा अधिक तिकीट दर लावले जात असल्याने प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. जास्त अंतरासाठी जितका तिकीट दर आहे, तितकाच तिकीट दर कमी अंतरासाठीही आकारला जात आहे. यामध्ये विविध मार्गांवर तिकीट दर आकारणीसाठी निश्चित केलेल्या टप्प्यांनुसार तिकीट दर निश्चित केल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र, यामुळे जास्त अंतरासाठी असलेलाच तिकीट दर कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्याही माथी मारला जात असल्याचे दिसून येत आहे.
पुणे ते पिंपरी आणि निगडीला सारखेच तिकीट
पुणे मनपाहून खडकी, दापोडी, पिंपरीमार्गे निगडी असा प्रवास करणाºयाला २५ रुपयांचे तिकीट दिले जाते. मात्र, मनपाहून पिंपरीत अथवा चिंचवडला उतरणाºया प्रवाशाकडूनही २५ रुपयेच घेतले जातात. निगडीपेक्षा पिंपरी आणि चिंचवडचे अंतर कमी असतानाही निगडीइतकेच भाडे आकारले जाते. त्यामुळे यातून प्रवाशांची आर्थिक लूटच केली जात आहे.
तिकीट दरातील तफावतीचा फटका
पिंपरी-चिंचवड परिसरातून पुण्याला कामानिमित्त जाणाºयांची संख्या मोठी आहे. लाखो प्रवासी दररोज पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात ये-जा करतात. मात्र, अशाप्रकारे तिकीट दरामध्ये मोठी तफावत असल्याने प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागत आहे.
पीएमपी मार्गांवर तिकीट दर आकारणीसाठी टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार तिकीट दरआकारणी केली जाते. मनपाहून निगडीपर्यंत २५ रुपये तिकीट असले, तरी निश्चित केलेल्या टप्प्यानुसार पिंपरी, चिंचवड व त्यापुढील स्थानकांसाठीही २५ रुपये तिकीट दर आकारणी केली जात आहे. - सतीश गव्हाणे, व्यवस्थापक, भक्ती-शक्ती आगार, निगडी