पीएमपीला मिळणार ६ आगार
By admin | Published: August 8, 2015 12:35 AM2015-08-08T00:35:58+5:302015-08-08T00:35:58+5:30
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे १० लाख प्रवाशांचा गाडा ओढणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) लवकर आणखी सहा सुसज्ज आगार मिळणार आहेत
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे १० लाख प्रवाशांचा गाडा ओढणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) लवकर आणखी सहा सुसज्ज आगार मिळणार आहेत. शेवाळवाडी, भेकराईनगर, बालेवाडी, शिंदेवाडी, सुस रस्ता आणि अप्पर इंदिरानगर येथे हे सहा आगार पुढील चार ते सहा महिन्यात टप्प्याटप्प्याने उभारले जाणार आहेत. वर्कशॉपसह हे सहाही आगार कार्यान्वित केले जाणार असल्याने सध्याच्या दहा आगारांवरील मोठा ताण कमी होणार आहे, अशी माहिती पीएमपीच्या प्रशासनाने दिली.
पुण्यात सार्वजनिक बसवाहतुक सुरू झाल्यानंतर पहिले सुसज्ज आगार स्वारगेट येथे सुरू झाले. त्यानंतर शहराचा विकास होत गेला, तसे बसेसची संख्याही वाढत गेली. त्यानुसार नवीन आगार सुरू करण्यात आले. पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवडमध्येही बसवाहतुक सुरू झाल्यानंतर आगार तयार करण्यात आले. पीएमटी व पीसीएमटीचे एकत्रीकरण झाल्यानंतर ‘पीएमपी’अंतर्गत पुणे शहरातील सात तर पिंपरी चिंचवडमध्ये मधील तीन आगारांचा समावेश झाला. या दोन्ही शहरांतील शेवटचे आगार पुणे स्टेशन येथे २००४ मध्ये सुरू झाले.
त्यानंतर आजपर्यंत प्रवासी संख्या व बसेसमध्ये मोठी वाढ होवूनही
नवीन आगार निर्माण करता आलेले नाही. त्यामुळे सध्याच्या आगारांवरच मोठा ताण पडत आहे. यापार्श्वभुमीवर पीएमपी प्रशासनाने नवीन सहा
आगार सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याविषयी बोलताना पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, सध्या भेकराईनगर व शेवाळवाडी येथे तात्पुरत्या
स्वरूपात आगार तयार करण्यात
आले आहे. तर बालेवाडी,
शिंदेवाडी व अप्पर इंदिरानगर येथे बसस्थानक सुरू झाले आहे. सुस रस्ता येथेही लवकरच स्थानक सुरू केले जाईल. टप्प्याटप्याने या सहाही ठिकाणी वर्कशॉपसह आगार तयार केले जाईल. (प्रतिनिधी)