PMPML: वाहकांनो, कंटाळा नकोच... प्रवाशांना जागेवर तिकीट द्या, नाहीतर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 12:25 PM2024-02-01T12:25:22+5:302024-02-01T12:27:11+5:30
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पीएमआरडीए हद्दीत पीएमपीकडून सार्वजनिक वाहतूक सेवा दिली जाते....
पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये प्रवाशांना त्यांच्या जागेवर जाऊन तिकीट न दिल्यास वाहकांवर कारवाई करणार असल्याचा इशारा पीएमपी प्रशासनाने दिला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पीएमआरडीए हद्दीत पीएमपीकडून सार्वजनिक वाहतूक सेवा दिली जाते.
दररोज सरासरी आठ ते दहा लाख नागरिक पीएमपीतून प्रवास करतात. बसमध्ये गर्दी नसताना देखील वाहक जागेवर बसून नागरिकांना तिकीट घेण्यासाठी बोलावून घेतात. पण, प्रवाशांच्या जागेवर जाऊन तिकीट देण्याची वाहकांची जबाबदारी असताना ते कंटाळा करतात. यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यात काही वेळेस किरकोळ वाद होतात. वाहक तिकीट देण्यासाठी येत नसल्याच्या तक्रारी पीएमपी प्रशासनाकडे वारंवार येत असल्यामुळे प्रशासनाने मंगळवारी परिपत्रक काढून तिकीट प्रवाशांना त्यांच्या जागेवर जाऊन देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या वाहकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
थांब्याजवळ बस उभी करण्याचे आदेश
पीएमपीचे बसचालक थांबा जवळ आल्यावर बस रस्त्याच्या मध्येच उभी करतात. यामुळे वाहतूक कोंडी होते. प्रवाशांना देखील रस्त्याच्या मध्ये उतरवल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना बसमध्ये बसताना आणि उतरताना यामुळे गैरसोयीचे होते. वाहतूक पोलिसांनी पीएमपी प्रशासनाला पत्र दिले आहे. यावर पीएमपी प्रशासनाने सर्व चालकांना बस थांब्याजवळ उभी करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे.