‘पीएमपी’ची पास केंद्रे ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 05:11 AM2017-10-03T05:11:30+5:302017-10-03T05:11:55+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) विद्यार्थी पंचिंग पास बंद करून ‘आॅल रूट’चा साडेसातशे रुपयांचा पास घेणे बंधनकारक केल्याने पासच्या माध्यमातून मिळणा-या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे.
पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) विद्यार्थी पंचिंग पास बंद करून ‘आॅल रूट’चा साडेसातशे रुपयांचा पास घेणे बंधनकारक केल्याने पासच्या माध्यमातून मिळणा-या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. तसेच पीएमपीची पास केंद्रही अक्षरश: ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
पीएमपी बससेवेचा शहरातील हजारो प्रवासी लाभ घेतात. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पीएमपीएलकडून ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना सवलतीच्या दरात प्रवासी पास दिला जात होता. मात्र, विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी असलेला पंचिंग पास १ सप्टेंबरपासून बंद करून आॅल रूटचा ७५० रुपयांचा पास सुरू केला आहे.
हा पास बंद केल्याने प्रवासाचे अंतर कमी असेल, तरीही अशा विद्यार्थ्यांना पाससाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. यात ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. कमी अंतरावर एकदाच ये-जा करावी लागत असल्याने पंचिंग पास परवडत होता. एखाद्या मार्गाला महिन्याला चारशे रुपयांचा पास लागत असताना आॅल रुटचा साडेसातशे रुपयांचा पास घेऊन काय करणार असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. यामुळे आॅल रूटचा पास न घेता अनेकजण खासगी प्रवासी वाहनाने प्रवास करण्यासही प्राधान्य देत आहेत.
पंचिंग पास सुरू करण्याची मागणी
आॅल रूट पासमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्रवाशांचा विचार करून पीएमपीने पंचिंग पास पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.