उद्दिष्टपूर्ती होईपर्यंत पीएमआरडीएचे विलिनीकरण नाही : किरण गित्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 01:46 PM2018-11-24T13:46:27+5:302018-11-24T13:52:11+5:30
पीएमआरडीएच्या विलिनीकरण चर्चेवर पडदा पडला आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ज्या उद्देशाने स्थापन झाले. उद्दिष्टपूर्ती होईपर्यंत प्राधिकरणाचे विलिनीकरण करण्यात येणार नाही. एकात्मिक विकासासाठी पीएमआरडीए ही एकच संस्था असणे गरजेचे आहे, असे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी येथे सांगितले. त्यामुळे पीएमआरडीच्या विलिनीकरण चर्चेवर पडदा पडला आहे.
पीएमआरडीएची स्थापना झाल्यानंतर प्राधिकरणाचे विलिनीकरण होणार याबाबतचे सुतोवाच भाजपाच्या नेत्यांनी केले होते. त्यानंतर विलिनीकरणास विरोध झाला होता. पिंपरी-चिंचवड प्रेस क्लबने गित्ते यांच्याशी संवाद आयोजित केला होता.गित्ते म्हणाले, एका कार्यक्षेत्रात दोन प्राधिकरण असत नाही. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये प्राधिकरणाची स्थापना अनेक वर्षांपूर्वी झाली. विलिनीकरणाची चर्चा होती. प्राधिकरण ज्या उद्देशाने स्थापन झाले. नियोजित काम झाल्यानंतर पीसीएनटीडीएचे विलिनीकरण प्राधिकरणात करण्यास हरकत नाही.
गित्ते म्हणाले, पीएमआरडीएचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. पीएमआरडीएचे मुख्यालय पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरणाच्या आकुर्डीतील कार्यालयात असणार आहे. येत्या २७ नोव्हेंबरला क्रॉप्रेसिव्ह ट्रॅफिक, ट्रान्सपोर्ट मोबीलीटी प्लानचे सादरीकरण करण्यात येणार आहे. एल एन टीच्या संशोधन टीमने तो तयार केला आहे. पीएमआरडीएच्या धर्तीवर हा आराखडा असणार आहे. त्याअंतर्गत वाहतूक नियोजन, आराखड्याचा समावेश असणार आहे. रिंग रोड, मेट्रो, मोनो रेल आदींचे नियोजन केले जाणार आहे. मेट्रोसाठी ताशी १८००० प्रवाशी तर बीआरटीसाठी आठ हजार प्रवाशांनी प्रतिताशी प्रवास करणे आवश्यक असतो. तेव्हा या सेवा देणे संबंधित संस्थांना शक्य होणार आहे.
आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे सर्वेक्षण
पुणे जिल्ह्यातील ७२५७ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश यात असणार आहे. पुणे ग्रामीण, शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नियोजनाचे काम सुरू आहे. पुढील पन्नास वर्षांची वाढ लक्षात घेता हा आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच डीपी आराखड्याचेही नियोजन केले जाणार आहे. सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या माध्यमातून याबाबतचा सर्वे आणि नियोजन केले जाणार आहे, तसेच पीएमआरडीए क्षेत्रात १३ नगरनियोजनाचे आराखडे तयार केले जाणार आहे. पाचशे एकर अशा एकुण तेरा प्रकल्प होणार आहेत, तसेच शिक्षण, औद्योगिक असे क्लस्टरही निर्माण करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, असे गित्ते यांनी सांगितले.